08 July 2020

News Flash

चित्ररंग : अंगावर काटा आणणारा ‘भया’नुभव!

‘फोबिया’ हा सर्वार्थाने वेगळा भयानुभव आहे. हा चित्रपट फक्त राधिका आपटेचा आहे.

‘फोबिया’ हा सर्वार्थाने वेगळा भयानुभव आहे. हा चित्रपट फक्त राधिका आपटेचा आहे.

भीती ही कितीतरी गोष्टींची असू शकते. पाण्याची, उंचीची, माणसांची, जागेची.. न जाणे कितीतरी गोष्टींची अकारण वाटणारी भीती कायम आपल्याला छळत असते. एरव्ही पडद्यावरचं चित्र पाहून भीती वाटायची तर त्याला भुतांच्या गोष्टी हव्यात. किंवा शांत-सुन्न खोलीत अचानकपणे खांद्यावर येणारा हात, त्याला विचित्र पाश्र्वसंगीताची जोड अशा सगळ्या गोष्टींची भट्टी जमवून भयपटांची मांडणी केली जाते. पवन क्रिपलानी दिग्दर्शित ‘फोबिया’ पाहताना या सगळ्या गोष्टींना फाटा दिलेला असला तरीही त्याच्या नावातला फोबिया अंगावर अक्षरश: काटा आणतो.
चित्रपट सुरू होतो तेव्हा मेहक (राधिका आपटे) नावाची चित्रकार तरुणी ‘अ‍ॅग्रोफोबिया’ या मानसिक रोगांशी लढताना दिसते. कामानिमित्त एका रात्री टॅक्सीत बसलेल्या मेहकवर टॅक्सीचालक बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. मेहक त्यातून सुटते खरी मात्र त्या रात्रीची भीती तिच्या मनात ठाण मांडून बसते. त्या भीतीपोटी स्वत:ला मेहक घरात कोंडून घेते. मेहकला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न थेरपिस्ट करते. मात्र तेही मेहकला सहन होत नाही. तेव्हा तिचा मित्र तिला एकटीला वेगळ्या घरात ठेवतो. तिने तिच्या भीतीवर मात करून नव्याने जगण्याचा प्रयत्न करावा या हेतूने तो तिला त्या नव्या घरी आणतो. मेहक हळूहळू रुळायला लागते. बाहेरच्या जगाची भीती घालवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेहकला घरातच काही विचित्र गोष्टी जाणवू लागतात. तिला कोणाचातरी वावर जाणवू लागतो. मग बाहेरच्या जगाच्या भीतीने आत दडून बसलेल्या मेहकला घरात राहण्याची भीती वाटू लागते. या भीतीपासून दूर जाण्याचा कोणताच मार्ग मेहकला सापडत नाही.
‘रागिणी एमएमएस’ फे म दिग्दर्शक पवन क्रिपलानीच्या ‘फोबिया’ या चित्रपटाची संकल्पना ही २०१३ साली त्याच नावाने आलेल्या हॉलीवूडपटाशी साधम्र्य सांगणारी आहे. पण तरीही त्याला आपल्या आशयात अडकवून ठेवण्याची किमया दिग्दर्शकाने साधली आहे. या चित्रपटातून त्याने दिलेला भयानुभव आपण आजवर कुठल्याच बॉलीवूडपटातून घेतलेला नाही. एरव्ही आवाज आणि भयावह चित्रणाच्या जोरावर केलेले थरारपट आपल्या वाटय़ाला येतात. ‘फोबिया’ हा सर्वार्थाने वेगळा भयानुभव आहे. हा चित्रपट फक्त राधिका आपटेचा आहे. अ‍ॅग्रोफोबियाशी झुंज देणारी आजची तरुणी, एका क्षणाला या भीतीवर मात करत दुसऱ्यावर झालेल्या अन्यायाचा माग काढण्यासाठी सज्ज झालेली आणि तरीही आपल्या स्वतंत्र विचारांशी प्रतारणा न करणारी एक वेगळी नायिका राधिकाच्या या रूपाने आपल्याला पाहायला मिळते. तिच्याएवढेच श्रेय दिग्दर्शकाला द्यायला हवे. कारण या चित्रपटातून केवळ भीती न दाखवता काही मेहकच्या रूपातून काही वेगळ्या गोष्टींवर भाष्य करण्याचा प्रयत्नही दिग्दर्शकाने केला आहे. दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेली भीती आपल्या अंगावर काटा आणते. चित्रपट माध्यमाची अचाट ताकद जाणवून देणारा असा हा चित्रपट आहे.

फोबिया
दिग्दर्शक- पवन क्रीपलानी
कलाकार-राधिका आपटे, सत्यदीप मिश्रा, यशस्विनी दायमा, नंदिता भट्टाचार्य,

रेश्मा राईकवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:22 am

Web Title: phobia movie review
टॅग Radhika Apte
Next Stories
1 चित्ररंग : इश्काचा रंग फिका..!
2 नाटय़रंग : आलाय मोठा शहाणा’ मॅडच्यॅप झिंगाट!
3 ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका हॉलीवूडला आवडतील’अनिल कपूरचा विश्वास 
Just Now!
X