काही दिवसांपूर्वी बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौली आणि निर्माते शोबू यारलागड्डा यांनी जपानमध्ये ‘बाहुबली- २’ च्या यशाबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोहोचले होते. जपानमध्ये ‘बाहुबली- २’ हा सिनेमा १०० दिवस चित्रपटगृहात चालला होता. जपानमध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्यांना तिथल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यावेळी दोघांना अनेक भेटवस्तुही देण्यात आल्या.

जपानमधील चाहत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि निर्माते शोबू यारलागड्डा यांनी उघडली. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी म्हटले की, आम्हाला जपानवरुन येऊन एक आठवडा झाला. मी जपानचे आभार मानू इच्छितो. बाहुबलीचेही आभार. आम्हाला या सिनेमामुळे अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि या सगळ्या देशांमध्ये सर्वात आवडलेला देश जपान आहे.

राजामौली पुढे म्हणाले की, त्यांना जपानमध्ये भरपूर प्रेम मिळाले. आम्हाला अनेक भेटवस्तू मिळाल्या. आता आम्ही या सर्व वस्तू उघडून पाहत आहोत. यात चाहत्यांनी तयार केलेले पेन्टिंग्ज, पंखे आणि अनेक गोष्टींचा समावेश आहे. चाहत्यांनी दिलेल्या भेटवस्तूंनी आमच्या साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले.

राजामौली म्हणाले की, प्रत्येक भेटवस्तू ही वेगळ्या पद्धतीने सजवली होती. अजूनपर्यंत प्रभास आणि राणा डग्गुबत्ती यांनी भेटवस्तू उघडून पाहिल्या नाहीत. पण त्यांनाही या भेटवस्तू आवडतील यात काही शंका नाही.