आमिर खान आणि विराट कोहली अभिनय आणि क्रिकेट क्षेत्रातील हे दोन दिग्गज येत्या दिवाळीत चाहत्यांना एक खास भेट देणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला सोमवारी दिली. एका चॅट शोमध्ये हे दोघे सहभागी होणार असून आपल्या जीवनातील काही मजेदार किस्से चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. या चॅट शोचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून सेटवरील काही फोटो आमिर आणि विराटच्या ‘फॅन क्लब’च्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.

दोघांनीही आपल्या भूमिकेची अदलाबदल केल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळतंय. कारण आमिरने त्याच्या हातात क्रिकेट जर्सी आणि विराटने हातात क्लॅपबोर्ड घेतला आहे. त्यामुळे या दोघांना स्क्रीन शेअर करताना पाहणं चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरेल असं म्हणायला हरकत नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट त्याच्या खासगी जीवनाबद्दल कॅमेरासमोर सहसा मोकळेपणाने बोलत नाही. या शोच्या माध्यमातून आमिर त्याला बोलतं करेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

PHOTO : तुम्हाला हसवणाऱ्या कलाकारांची घरी काय अवस्था असते बघा

विराट-आमिरचा हा चॅट शो ‘झी टीव्ही’वर प्रसारित होणार असून शोचे नाव अद्याप समजू शकलं नाही. ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असेलल्या आमिरने विराटसाठी एक दिवसाचा वेळ काढून शूटिंग पूर्ण केलं. शूटिंगनंतर तो पुन्हा प्रमोशनसाठी इस्तांबूलला रवाना झाला.