News Flash

Picasso Movie Review : आनंदाचा झरा

आपल्याकडील सिनेमाच्या तथाकथित चौकटीत न बसणारा असा हा चित्रपट आहे.

रेश्मा राईकवार

साध्यासुध्या माणसांच्या आयुष्यातील साध्यासरळ घटना. या घटनांची धार ना इतरांच्या मनाला लागत, ना त्यांना आनंद देत. कोणा एकाच्या आयुष्यात आलेला समरप्रसंग, त्याचा त्यालाच पेलावा लागतो आणि हे द्वंद्व जर कलासक्त मनाचं त्या बाहेरच्या व्यवहारी जगाशी असेल तर त्याचे ओरखडे त्या एकटय़ा कलाकारापुरती राहात नाहीत, त्याचं कुटुंबही त्यातून तावून सुलाखून निघतं. कोकणातील लोप पावत चाललेली दशावतारी कला आणि एका कलावंताचा त्याच्या आत्म्याशी सुरू असलेला झगडा हे दोन्ही खेळ एकात एक गुंफून आपल्यासमोर भावभावनांचं अप्रतिम चित्र रंगवणारा चित्रपट म्हणून ‘पिकासो’चे वर्णन करता येईल.

आपल्याकडील सिनेमाच्या तथाकथित चौकटीत न बसणारा असा हा चित्रपट आहे. इथे शब्दातून बोलण्यापेक्षा कलाकारांच्या व्यक्त होण्यातून चित्रपट जास्त बोलतो. एखादं सुंदर स्मृतिचित्र आपल्यासमोर यावं आणि त्याकडे एकटक पाहात ज्याने त्याने त्यातला भावार्थ समजून घ्यावा, ही अनुभूती दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी ‘पिकासो’तून दिली आहे. कोकणातील पारंपरिक दशावतारी कलेची नव्याने ओळख या चित्रपटात होते. एके  काळी वैभवी इतिहास अनुभवलेली ही कला काळाच्या ओघात लुप्त होते की काय अशी परिस्थिती आहे.. त्या पाश्र्वभूमीवर कोकणात कु डाळ येथील वालावल गावच्या ज्या लक्ष्मी नारायण मंदिरातून या दशावतारी कलेची मुहूर्तमेढ रोवली गेली होती, त्याच गावात हा चित्रपट साकार झाला आहे. पांडुरंग गावडे (प्रसाद ओक) हा उत्तम चित्रकार. त्याच्या कुंचल्यात जादू आहे याची जाण सगळ्यांना आहे, मात्र ही जादू त्याला आर्थिक सुख देऊ शकत नाही. त्याने घडवलेल्या, रंगवलेल्या गणेशमूर्ती गावच्या घराघरांतली शान आहे. कलाकाराने आपल्या अपेक्षेनुसार उत्तम गणेशमूर्ती घडवावी ही गावकऱ्यांची इच्छा.. पण त्याच्या या कौशल्यासाठी पदरचे चार जास्त पैसे खर्चायची त्यांची तयारी नाही. पांडुरंग चित्रकार आहे, शिल्पकार आहे आणि तो उत्तम गायक नटही आहे. चेहऱ्याला रंग लावून तो त्याच तन्मयतेने दशावताराचा खेळही रंगवतो. कलेप्रति त्याची असलेली आसक्ती आणि घरची आर्थिक परिस्थिती यातली विसंगती त्याला ज्ञात असली तरी आपल्या मुलाने- गंधर्वने उत्तम चित्रकार व्हावं ही त्याच्या मनीची आस. गंधर्वच्याही हातात ती कला उतरली आहे; पण घरातल्या अडचणी इतक्या वाढल्यात की, सध्या पांडुरंगाच्या मनातील कलाकार अस्वस्थ आहे, तो दुखावला गेला आहे. त्याच्या कलेच्या जोरावर तो घरच्यांना किमान सुख मिळवून देऊ शकत नाही हा त्याच्या मनातील सल आपल्याला लख्ख दिसत राहतो इतका तो अस्वस्थ आहे. याच अस्वस्थेत तो नेहमीप्रमाणे दशावताराचा खेळ रंगवायला बाहेर पडतो. त्याच वेळी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत गंधर्व पहिला येतो आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला दुसऱ्याच दिवशी पैसे भरायचे असतात. या स्पर्धेत तो पहिला आला तर स्पेनमध्ये जाऊन वर्षभर चित्रकला शिकायची संधी त्याला मिळणार असते. बाबांनी दिलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जाण्याची संधी गंधर्वला दिसते आहे, तर दुसरीक डे त्याच्या वडिलांसमोरच्या अडचणींचा डोंगर वाढत चालला आहे. गंधर्व आणि पांडुरंग या बापलेकांचं एकत्र येणं, गंधर्वाच्या हातात असलेल्या कलेची पांडुरंगला झालेली जाणीव, त्याला मिळालेली नवी ऊर्जा आणि त्यातून रंगत गेलेला दशावताराचा प्रयोग या सगळ्यातून हे आनंदचित्र पूर्ण होतं का? या उत्तरासाठी हा दशावताराचा खेळ पाहायला हवा.

एरव्ही एका चित्रपटात चाललेला दुसरा चित्रपटाचा प्रयोग किं वा एका नाटकात सुरू असलेले दुसरे नाटक आपण अनुभवलं आहे. इथे सुरुवातीची काही मिनिटं सोडली तर चित्रपटात दशावताराचा खेळ रंगू लागतो आणि पुढे त्या खेळातच पांडुरंग आणि गंधर्वच्या नात्याची गोष्ट, कला आणि कलाकाराची गोष्ट दिग्दर्शकाने बेमालूम रंगवली आहे. दशावताराची काहीही ओळख नसलेल्या व्यक्तीसाठी चटकन या खेळाशी जोडलं जाणं किंचित अवघड जाईल. मात्र अशा अनवट चित्रपटासाठी आपले नेहमीचे ठोक ताळे बाजूला सारून, स्वच्छ कोऱ्या पाटीच्या मनाने समोरचं नाटय़ पाहायला हवं. क्वचितप्रसंगी हा दशावताराचा प्रयोग रेंगाळल्यासारखा वाटतो, पण त्याचा परिणाम चित्रपटाचा प्रभाव कमी करत नाही. अभिनेता प्रसाद ओकला खूप वर्षांनंतर इतकी संवेदनशील आणि गहिरे भाव असलेली भूमिका रंगवताना पाहण्याची पर्वणी या चित्रपटाने दिली आहे. त्या तुलनेत समय तांबे या बालकलाकाराला आहे त्या पद्धतीने सहज व्यक्त होत वावरण्याची संधी दिग्दर्शकाने दिली आहे. त्यामुळेच की काय, समयच्या नजरेतून दिसणारं जग अनुभवताना आपल्याला त्यात कु ठलीही कृत्रिमता जाणवत नाही हे दिग्दर्शकाचं यश म्हणावं लागेल. दशावतारी कलाकारांचा अचूक वापर, निळकं ठ सावंत आणि विठ्ठल गावकर या दशावतारी गायक नटांच्या आवाजातील गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. पडद्यावरही या दोघांनी काम के ले असल्याने खरोखरच एखाद्या गावातला, मंदिरात दाटीवाटीने बसलेल्या गावकऱ्यांच्या साक्षीने रंगलेला दशावतारी खेळ पाहिल्याचा आनंद या चित्रपटातून मिळतो. एका कलेच्या ऱ्हासपर्वाची गोष्ट सांगताना त्याचे लयाला जाणे दिग्दर्शक रंगवत नाही, तर त्या कलेशी जोडून घेत, समरस करत नवी आशा, नवी दृष्टी तो प्रेक्षकांना देतो. हाच आनंदाचा दुवा ‘पिकासो’ची गोष्ट संस्मरणीय करतो.

पिकासो

दिग्दर्शक – अभिजीत मोहन वारंग

कलाकार – प्रसाद ओक, समय तांबे, अश्विनी मुकादम, विठ्ठल गावकर, निळकं ठ सावंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 12:09 am

Web Title: picasso marathi movie review zws 70
Next Stories
1 पुन्हा भयघंटा..
2 अक्षय कुमारचा ‘अतरंगी’ अवतार; जादूगाराच्या लूकमधला फोटो केला शेअर
3 “तू आमच्या समोर नसणार पण”, आईच्या निधनानंतर डॉ. गिरीश ओक झाले भावूक
Just Now!
X