आईच्या मृत्यूनंतर दोन वर्षांची मुलगी एकटी घरात काय काय करू शकेल आणि कोणत्या परिस्थितीतून जाईल हे विचार करणंसुद्धा अवघड आहे. आगामी ‘पीहू’ या चित्रपटाची हीच कथा आहे आणि अंगावर काटा आणणारा, काळजाचा ठोका चुकवणारा त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद काप्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

जवळपास दोन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये एक छोटीशी मुलगी घरात एकटी असताना काय काय करते हे दाखवण्यात आलं आहे. अकस्मात तिच्या आईचा मृत्यू आणि त्यानंतरचा छोट्या पीहूचा प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तिचं फ्रीजमध्ये जाऊन बसणं, गॅस पेटवणं, मायक्रोवेव्ह ऑन करणं आणि त्यातच बेडवर निपचित पडलेल्या आईला सतत आवाज देणं पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

वाचा : बोल्ड कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटचं सडेतोड उत्तर 

हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चिमुकल्या मायरा विश्वकर्माने यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. १६ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.