03 March 2021

News Flash

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानात ‘पिंक’वर बंदी

दोन्ही देशांमधील तणाव संपुष्टात येईपर्यंत भारतीय चित्रपटांवर बंदीची शक्यता

पिंक चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये पिंक चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत दोन्ही देशांचे संबंध सुधारणार नाहीत, तो पर्यंत ‘पिंक’वरील बंदी कायम राहणार आहे. मात्र अद्याप तरी पाकिस्तान सरकारने याबद्दल कोणताही अधिकृत आदेश काढलेला नाही. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने (इम्पा) भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘जोपर्यंत दोन्ही देशांमधील तणाव निवळत नाही, तोपर्यंत भारतीय चित्रपट पाकिस्तानात दाखवले जाणार नाहीत,’ असे नदीम मांडीवाला यांनी म्हटले आहे. नदीम मांडीवाला इस्लामाबादमधील सेंटाउरस सिनेमा, कराचीतील एट्रियम सिनेमा आणि मांडीवाला एन्टरटेनमेंटचे प्रमुख आहेत. ‘माझ्या चित्रपटागृहात शुक्रवारपासून कोणताही भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मागील आठवड्यात पिंक आणि बँजो प्रदर्शित झाले होते. तर या आठवड्यात एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी प्रदर्शित झाला आहे. मात्र आता यातील कोणताच चित्रपट पाकिस्तानात दाखवला जाणार नाही’, असे मांडीवाला यांनी म्हटले आहे. चित्रपटाच्या वितरकांनीदेखील भारतीय चित्रपट वितरीत न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुपर सिनेमाचे मालक खोरेम गुल्टासाब यांनीदेखील अशीच भूमिका घेतली आहे. ‘मी आधीच सर्व भारतीय चित्रपट दाखवणे बंद केले आहेत. यासाठी कोणत्याही अधिकृत आदेशांची आवश्यकता नाही. आमचे सैन्य आणि अभिनेते यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळे कमीतकमी दोन आठवडे कोणताही भारतीय चित्रपट माझ्या थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही,’ असे गुल्टासाब यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानात सर्वाधिक चित्रपटगृहे असणाऱ्या सिनेप्लेक्सने अद्याप तरी कोणत्याही भारतीय चित्रपटावर बंदी घातलेली नाही. एग्जीबिटर्सनी त्यांच्या सहमतीने एखादा निर्णय घेतल्यास त्याचे पालन केले जाईल, असे सिनेप्लेक्सच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. इम्पाने गुरुवारी भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच आता पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात येणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 8:20 pm

Web Title: pink movie banned in pakistan after surgical strike
Next Stories
1 ‘या’ चित्रपटासाठी आलिया आणि परिणीतीमध्ये रस्सीखेच
2 शाहरुखचा इम्तियाज अलीवर आरोप
3 ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जाण्यास धोनीचा नकार?
Just Now!
X