पिप्सी

छोटय़ा-छोटय़ा भावना, छोटय़ा-छोटय़ाच गोष्टी आणि त्यातून मिळणारे मोठे शहाणपण.. हा नेहमीच पाहण्याचा आणि शिकण्याचा अनुभव असतो. लहानग्यांच्या नजरेतून जग पाहताना ते किती साधे आहे, त्यातला निरागसपणा, प्रामाणिकपणा अजूनही कायम आहे ही भावना सुखावून जाते. आणि ही भावना सहज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला तितकेच दोन जबरदस्त बाल कलाकार असतील तर मनोरंजन आणि बोध या दोन वेगवेगळ्या गोष्टी उरतच नाहीत. त्या एकत्र आपल्यापर्यंत येऊन भिडतात. ‘पिप्सी’ हा असा धम्माल सहज अभिनयाने नटलेला अनुभव आहे.

आईच्या आजारपणाची माहिती कळल्यानंतर ती देवाघरी जाऊ नये यासाठी प्रयत्न करणारी छोटी चानी (मैथिली पटवर्धन) आणि तिचा वर्गमित्र बाळू (साहिल जोशी) यांच्या मैत्रीची, त्यांच्या मैत्रीतून सध्या हरवत चाललेल्या माणूसकीच्या संवेदनांची जाणीव करून देणारी ही ‘पिप्सी’ची गोष्ट आहे. सौरभ भावे यांनी ‘पिप्सी’ची कथा लिहिली आहे. योगायोगाने त्यांनीच लिहिलेल्या कथांवरचे दोन्ही चित्रपट या आठवडय़ात एकाच वेळी प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या लेखणीतून उतरलेली ही रोजच्या जगण्यातली पण त्यातले वेगळेपण जाणवून देणारी अशी गोष्ट आहे. आई आजारी असल्याने चानी अस्वस्थ आहे. बाळूला तिची अस्वस्थता पाहवत नाही. तो आपल्या पद्धतीने तिला हसवण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करतो. त्याच प्रयत्नात असताना एका अस्वस्थ क्षणी बुवांचे कीर्तन ऐकताना एखादा मासा पाळला तर आईचे प्राण वाचतील, अशी चानीची धारणा होते. आणि मग मासा कसा शोधायचा? इथपासून ते त्याला शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी या दोघांची एकच धडपड सुरू होते. त्यांच्या या धडपडीतून, रुसव्या-फुगव्यातूनच आजूबाजूचे जगही दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. पाऊस नाही म्हणून पाणी नाही, पाणी नाही म्हणून शेती नाही. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याऐवजी शेतजमिनी विकून पैसे घेण्याचे आमिष गावक ऱ्यांना दाखवले जाते. शेतजमिनींचे एनए प्लॉट करून तिथे बंगल्यांची रांग उभी राहते आहे. पैसे मिळवण्याचा हा काही मूठभर लोकांचा धंदा शेतीचे, जमिनीचे पर्यायाने कधीकाळी याच काळ्या मातीतून सोने पिकवणाऱ्या शेतक ऱ्यांचा जीव घेतो आहे. चानी आणि बाळूच्या गोष्ट सांगता सांगता हे सारे वास्तव आपल्याला दाखवण्यात दिग्दर्शक रोहन देशपांडे यशस्वी ठरले आहेत.

नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून येणारी आर्थिक संक टे या दुष्टचक्राचा भेद कसा करायचा हेच समजू न शकणारा शेतकरी आपल्या परीने आपल्या इच्छाशक्तीवर जमीन टिकवून आहे. मग तहसीलदारांकडून योग्य पद्धतीने नुकसानीचे मोजमाप व्हावे यासाठीही त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च करण्यात त्याची शक्ती खर्च पडते आहे. हे अमानुषतेचे कुठले निकष आहेत? जे न पाळू शकणारा शेतकरी आत्महत्येशिवाय काहीच करू शकत नाही. या सगळ्या संकटातही आपल्या निरागसतेने आल्या संकटावर मात करणारी बाळू-चानीची जोडी मात्र आपल्या मनात आशेचा किरण जागवत राहते. चानी आणि बाळूची छोटी-छोटी भांडणे, संकटातही त्यांचे एकमेकांसाठी कायम बरोबर असणे, त्यांची मैत्री या सगळ्या गोष्टी आपल्याला नव्याने जगायला शिकवल्याशिवाय राहत नाहीत. अत्यंत साध्या गोष्टीतून दिग्दर्शकाने केलेली ही मांडणी खूप प्रभावी आहे. हा वरवर साधा वाटणारा पण जगण्याचे नवे तत्त्व शिकवणारा चित्रपट मैथिली आणि साहिल या दोन्ही बालकलाकारांनी त्यांच्या खांद्यावर पेलून धरला आहे. चित्रपटातील अगदी मोजक्या फ्रेम्स वगळता ही जोडगोळी आपल्याला चित्रपटभर सहज वावरताना, बागडताना दिसते. या दोघांचा अभिनय, दिग्दर्शकाची सहज मांडणी आणि त्याला लाभलेले उत्तम पाश्र्वसंगीत या सगळ्या धाग्याधाग्यांतून ही सुंदर गोष्ट गुंफली गेली आहे. अविराम मिश्रा यांच्या कॅमेऱ्याचा उल्लेख केल्याशिवाय ‘पिप्सी’ची गोष्ट पूर्ण होणार नाही. आशादायक गोष्टींनी भरलेली ही ‘पिप्सी’ पूर्णपणे मनात उतरवायला हवी यात शंका नाही.

* दिग्दर्शक – रोहन देशपांडे

* कलाकार – मैथिली पटवर्धन, साहिल जोशी, अजय जाधव, अतुल महाले, अभिलाषा पाटील, पूजा नायक.