News Flash

हृदयी धरले ‘नाटय़संगीत’

महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत असताना नाटकात काम करण्याबाबत सूचना लागली होती. ‘

मराठी चांगले बोलता येत नाही, बोलण्यावर कोकणी भाषेची छाप आहे, अशा कारणांमुळे महाविद्यालयीन जीवनात त्यांना नाटकात काम करण्याची संधी नाकारण्यात आली. ही बाब त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक व ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले मराठी बोलणे, वाचणे आत्मसात केले आणि पुढे व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अभिनेता आणि गायक म्हणून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांनी आपली नाममुद्रा केवळ नाटय़संगीतावरच नव्हे तर भावसंगीत, चित्रपट संगीत आणि लोकसंगीतावरही तेवढय़ाच समर्थपणे उमटविली. ज्यांची गाणी आज इतक्या वर्षांनंतरही रसिकांच्या स्मरणात आणि ओठावर आहेत ते ज्येष्ठ गायक-अभिनेते रामदास कामत. ‘पुनर्भेट’च्या निमित्ताने हा किस्सा त्यांनी सांगितला.
ते म्हणाले, १९४९ ते १९५३ या काळात मी विल्सन महाविद्यालयात शिकत होतो. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत असताना नाटकात काम करण्याबाबत सूचना लागली होती. ‘घराबाहेर’ हे नाटक बसवण्यात येणार होते. विजया जयवंत (आत्ताच्या विजया मेहता) त्यात काम करणार होती. मला त्या नाटकात ‘पद्मनाभ’च्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली. नाटकाचे वाचन झाले. मीही त्यात सहभागी झालो. पण मला मराठी नीट बोलता येत नाही, मराठीवर कोकणी भाषेची छाप आहे, असा आक्षेप घेऊन काम देता येणार नाही असे सांगण्यात आले. ही वस्तुस्थिती असली तरी मला खूप वाईट वाटले. आपले मराठी बोलणे चांगले करायचे, असे त्याच वेळी ठरवले. आमच्या महाविद्यालयात ज्येष्ठ समीक्षक प्रा. वा. ल कुलकर्णी हे मराठी विषय शिकवायचे. त्यांचा भाचा माझा मित्र होता. वालंच्या वर्गात मला मराठीच्या तासाला बसायला मिळेल का?, असे मी त्याला विचारले. त्याने ‘वालं’शी भेट घालून दिली. मी सरांना माझे मराठी सुधारण्यासाठी तुमच्या तासाला बसण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. सरांनी ते मान्य केले. ‘वालं’चे शिकविणे आणि मार्गदर्शन यामुळे मी चांगले मराठी बोलायला, वाचायला शिकलो. पुढे व्यावसायिक मराठी संगीत रंगभूमीवर अनेक नाटकांमधून विविध भूमिका केल्या. औरंगाबाद येथे ‘धन्य ते गायनी कळा’ या माझ्या नाटकाचा प्रयोग होता. योगायोगाने ‘वाल’ त्या प्रयोगाला आले होते. मध्यंतरात ते कलाकारांना भेटायला आले तेव्हा मी त्यांच्या पाया पडलो व नमस्कार केला. त्यांना मी असे का केले काही कळले नाही. तेव्हा मी त्यांना जुना संदर्भ देऊन माझी ओळख पटवून दिली.
कामत यांचे घराणे मूळचे गोव्याचे. साखळी हे त्यांचे गाव. गावातील नाटकवेडय़ा मंडळींनी ‘बेबंदशाही’ हे ऐतिहसिक नाटक बसवले. गंमत म्हणजे या ऐतिहासिक नाटकात त्यांनी काही गाणीही टाकली होती. हे नाटक व गाणी बसविण्यासाठी सखाराम पांडुरंग बर्वे यांना बोलाविण्यात आले होते. या नाटकात त्यांनी छोटी भूमिका केली होती. त्या वेळी त्यांचे वय पाच-सहा वर्षांचे होते. पुढे पणजीच्या ‘पीपल्स हायस्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तेव्हाची मॅट्रिक म्हणजे सातवीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत मामांकडे (वैकुंठ नेवरेकर) आले. कामत यांच्या घरातच गाणे होते. आई-वडील दोघेही गात असत. जात्यावर दळताना त्या काळातील गाणी आई म्हणत असे. दोन्ही मोठे भाऊ व बहिणीही गाणाऱ्या होत्या. घरातून लहानपणीच त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. कामत यांनी गाण्याचे सुरुवातीचे सर्व शिक्षण त्यांचे मोठे बंधू उपेंद्र कामत यांच्याकडे घेतले. तर पुढे नाटय़संगीताचे धडे गोविंदराव अग्नी यांच्याकडे गिरवले. नाटय़संगीतातील ‘भीष्माचार्य’ अशी रामदास कामत यांची ओळख असली तरी आपण शास्त्रीय संगीत शिकलो नाही, अशी खंत आजही त्यांच्या मनात आहे.
कामत हे अर्थशास्त्राचे पदवीधर. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५३ ते १९६० या काळात त्यांनी मुंबईत केंद्र सरकारच्या ‘अकाउंटंट जनरल’ ऑफिसमध्ये नोकरी केली. १९६० मध्ये ‘एअर इंडिया’मध्ये नोकरीला लागले व १९८९ मध्ये तेथूनच ‘व्यवस्थापक’ पदावरून निवृत्त झाले. संगीत रंगभूमीवर कामत यांनी अनेक नाटकांमधून काम केले. नोकरी सांभाळूनच त्यांनी नाटकांचे दौरे, तालमी केल्या.
रामदास कामत यांनी ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्रा’, ‘धन्य ते गायनी कळा’, ‘मदनाची मंजिरी’, ‘मानापमान’, ‘मीरा मधुरा’, ‘मृच्छकटिक’, ‘शारदा’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वरसम्राज्ञी’, ‘होनाजी बाळा’ आदी संगीत नाटकांतून कामे केली. ही सर्व नाटके आणि त्यातील गाणी गाजली. पण त्यातही ‘मत्स्यगंधा’ व ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकांनी त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली. ‘मत्स्यगंधा’ नाटकात त्यांनी ‘पराशर’ तर ‘ययाति आणि देवयानी’ नाटकात ‘कच’ या भूमिका साकारल्या. या दोन्ही नाटकांतील ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘नको विसरु संकेत मीलनाचा’, ‘साद देती हिमशिखरे’ (सर्व मत्स्यगंधा) तसेच ‘तम निशेचा सरला’, ‘प्रेम वरदान स्मरत राहा’ (ययाति आणि देवयानी) ही त्यांची नाटय़पदे गाजली. कामत यांनी गायलेली ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘जन विजन झाले’, ‘बहुत दिनी नच भेटलो सुंदरीला’, ‘श्रीरंगा कमला कांता’ ही गाणीही रसिकांच्या स्मरणात आहेत.
संगीत रंगभूमीवरील पदार्पण व संगीत रंगभूमीच्या आठवणींचा पट उलगडताना कामत म्हणाले, १९५६ मध्ये ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’च्या ‘संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाने संगीत रंगभूमीवर माझी सुरुवात झाली. नाटकातील ‘साधू’च्या भूमिकेसाठी मला बोलावले. नाटकाचे दिग्दर्शन गोपीनाथ सावकार तर संगीत दिग्दर्शन गोविंदराव अग्नी यांचे होते. भूमिका म्हटली तर छोटी असल्याने मी ती नाकारली. रागावूनच घरी आलो तर मोठय़ा बंधूंनी, असे करू नकोस तू काम कर असा सल्ला दिला. भावाचे ऐकून मी दुसऱ्या दिवशी पुन्हा सावकार यांच्याकडे गेलो व काम करायला तयार असल्याचे सांगितले. नाटकाचा पहिला प्रयोग साहित्य संघ मंदिरात झाला. नाटकात मी गायलेल्या ‘हृदयी धरा हा बोध खरा’ या पदाला कडाडून टाळ्या मिळाल्या. संगीत रंगभूमीवर मी गायलेले हे पहिले नाटय़पद. माझे गाणे ऐकून याच्यात काहीतरी वेगळे आहे हे सावकार व अग्नी यांना जाणवले. पुढे याच नाटकात मी ‘अश्विनशेठ’ ही भूमिका दीर्घकाळ केली. पुढे ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘मृच्छकटिक’ आदी संगीत नाटकेही केली. १९६४ मध्ये वसंत कानेटकर लिखित ‘मत्स्यगंधा’ हे नाटक आले. यात मी ‘पराशर’ करत होतो. नाटकाचे संगीत दिग्दर्शन पं. जितेंद्र अभिषेकी यांनी केले होते. नाटकाचे वाचन झाल्यानंतर अभिषेकी यांनी हे ‘संगीत नाटक’ नको करू या, असे कानेटकर यांना सुचविले. त्यावर हे संगीत नाटक म्हणूनच करायचे असे कानेटकर यांनी ठामपणे सांगून संगीत नाटकाचे आव्हान स्वीकारा, असे अभिषेकींना सांगितले. अभिषेकी यांनी ते आव्हान स्वीकारले आणि लेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांच्या सहकार्याने मराठी संगीत रंगभूमीवर या नाटकाने इतिहास घडविला. १९६६ मध्ये सादर झालेल्या ‘ययाति आणि देवयानी’ या नाटकातील ‘प्रेम वरदान’ हे नाटय़पद सुरुवातीला ‘त्रिताल’मध्ये बांधले होते. संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी बुवांना याची चाल बदलण्याची विनंती मी केली तेव्हा ते माझ्यावर चिडले, पण नंतर त्यांनी गाण्याच्या तालात बदल करून ते ‘झपताल’मध्ये केले. मला म्हणाले ‘मी चाल नाही तर ताल बदलला आहे.’
कामत यांनी नाटय़संगीतासह भावगीते, चित्रपट गीतेही गायली असून ‘एचएमव्ही’ कंपनीने त्यांच्या ६५ गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आहेत. ‘मत्स्यगंधा’ नाटकातील ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हे कामत यांचे ध्वनिमुद्रित झालेले पहिले गाणे. त्यांनी गायलेली ‘आकाशी फुलला चांदण्यांचा मळा’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे’, ‘पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, ‘वाटे भल्या पहाटे यावे’, ‘हे आदिमा हे अंतिमा’, ‘विनायका हो सिद्ध गणेशा’, ‘हे गणनायक सिद्धिविनायक’, ‘हे शिवशंकर गिरिजा तनया’ आदी भावगीते, चित्रपट गीतेही लोकप्रिय आहेत.
ravi03
‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या ‘प्रथम तुज पाहता जीव वेडावला’ या गाण्याची लोकप्रियता आजही तसूभर कमी झालेली नाही. या गाण्याविषयी बोलताना ते म्हणाले, गायक व संगीतकार सुधीर फडके यांचा मला दूरध्वनी आला आणि त्यांनी चित्रपटातील हे गाणे तुम्ही गावे असे सांगून रविवारी गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे आहे तर तुम्ही या, असे सांगितले. त्याच दरम्यान म्हणजे शनिवारी बार्शी येथे माझा गाण्यााचा कार्यक्रम होता आणि रविवारी गाण्याचे ध्वनिमुद्रण करायचे असल्याने मी जमणार नाही म्हटले. पण सुधीर फडके यांनी कसेही करून हे जमवाच असा आग्रह धरला. मी त्यांना होकार दिला. शनिवारी बार्शीचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या गाडीने मुंबईला परतायचे ठरवले. आरक्षण केलेले नसल्याने तिकीट काढून कसेबसे गाडीत चढलो. पुण्याला बसायला मिळाले. रात्रभर झोप झालेली नव्हती. माझा आवाज पार बसलेला होता. रविवारी दुपारी मुंबईत परतल्यानंतर फडके यांना मी आल्याचे सांगितले. गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी गेलो. संगीतसाथीला वसंत आचरेकर (तबला), राम नारायण (सारंगी), प्रभाकर पेडणेकर (ऑर्गन) अशी मंडळी होती. माझा आवाज बसलाय, मी चांगले गाऊ शकणार नाही, असे सांगून पाहिले, पण ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी गाण्याचे ध्वनिमुद्रण करणे गरजेचे होते, कारण सोमवारी कोल्हापूरला त्या गाण्याचे चित्रीकरण होणार होते व त्यासाठी रविवारी रात्रीच ते गाणे कोल्हापूरला पाठवायचे होते. त्यामुळे गळ्याचे काही व्यायाम करून मी माझा बसलेला आवाज मोकळा केला आणि ते गाणे ध्वनिमुद्रित केले. ते गाणे आजही रसिकांच्या स्मरणात आहे.
शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आहेच, पण इतर संगीत प्रकारांना कमी लेखून चालणार नाही. चित्रपट संगीत, भावसंगीत, नाटय़संगीत यांचेही संगीतात मोठे योगदान आहे. नाटय़संगीताचा स्वत:चा असा वेगळा बाज व शैली आहे. त्यामुळे अमुकच संगीत शिका, असे म्हणणे योग्य नाही. संगीत हे संगीत आहे, असे कामत यांचे आग्रहाचे सांगणे आहे. जुनी संगीत नाटके हा आपला अनमोल ठेवा आहेच ती नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजेत यात काही शंका नाही. पण त्याचबरोबर नव्या पिढीला आवडतील, त्यांना आपली वाटतील अशी नवीन संगीत नाटकेही रंगभूमीवर सादर झाली पाहिजेत, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा, एखादी स्वतंत्र संस्था/मंडळ स्थापन करावे व त्या माध्यमातून नवीन लेखक, संगीतकार, गायक, अभिनेते घडवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. वयाच्या ८५ व्या वर्षांत असलेले कामत आता वयोपरत्वे फारसे घराबाहेर पडत नाहीत किंवा जाहीर कार्यक्रमातूनही त्यांची उपस्थिती नसते. या वयातही दररोज किमान एक तास तरी ते रियाज करतात.
तुमच्या गाण्यांनी आम्हाला खूप आनंद दिला, असे सांगणारे रसिक भेटतात तो आनंद त्यांना एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोलाचा वाटतो. आपली गाणी आजही रसिकांच्या मनात आणि ओठावर आहेत हा माझ्यासाठी मोठा ठेवा असल्याचे ते सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 12:59 am

Web Title: play music director ramdas kamat
Next Stories
1 चित्ररंग : रहस्य मांडणीचा अनोखा प्रयोग
2 नाटय़रंग : सैरभैर
3 विजय मौर्यची ‘फोटोकॉपी’
Just Now!
X