मराठी संगीत रंगभूमीवरील लोकप्रिय आणि महत्वाचा मानदंड ठरलेल्या ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने हे नाटक आणि त्यातील गाण्यांचे स्मरणरंजन पुन्हा एकदा अनुभवयाला मिळणार आहे. गोवा येथील ‘अक्षय’ या संस्थेतर्फे नाटकातील लोकप्रिय गाणी, संवाद यावर आधारित ‘संगीत मत्स्यगंधा सुवर्णयुग’ हा कार्यक्रम तयार केला असून ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी तो मुंबईत सादर होणार आहे.
लेखन, अभिनय, संगीत, नेपथ्य अशा सर्वच दृष्टीने मराठी संगीत रंगभूमीवर लोकप्रिय झालेले हे नाटक आणि त्यातील अवीट नाटय़पदे आजही रसिकांच्या ओठावर आहेत. १ मे रोजी या नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने गोवा शासनाच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या विशेष सहकार्याने गोव्यात हा कार्यक्रम सादर झाला होता. आता तो कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि ९ नोव्हेंबर रोजी लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन गोव्यातील रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांची असून संगीत मार्गदर्शन ज्येष्ठ गायक-अभिनेते आणि या नाटकातील ‘पराशर’ ही भूमिका सादर करणारे रामदास कामत यांचे आहे. ‘संगीत मत्स्यगंधा सुवर्णयुग’ कार्यक्रमात रामदास कामत यांच्यासह गोव्यातील ज्येष्ठ गायक सुमेधा देसाई, चंद्रकांत वेर्णेकर हे गायक नाटय़पदे तर डॉ. अजय वैद्य व सिद्धी उपाध्ये हे नाटकातील काही निवडक प्रवेश सादर करतात. कार्यक्रमाचे निवेदनही डॉ. वैद्य व उपाध्ये यांचे आहे.
मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर, फैय्याज, ललिता केंकरे, शोभा आर्य, इंदुमती पैंगणकर, सुनंदा तोरगल या नाटकातील कलाकारांचा तसेच नाटकाशी संबंधित प्रा. मधुकर तोरडमल, पं. तुळशीदास बोरकर यांचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या दोन्ही कार्यक्रमांसाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.