मल्याळम मासिक ‘गृहलक्ष्मी’च्या मुखपृष्ठावर एक महिला तिच्या बाळाला स्तनपान करतानाचा फोटो छापण्यात आला होता. ज्यानंतर या मासिकावर अनेकांनीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना न्यायालयात या मासिकाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली. पण, आता मात्र केरळ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

‘गृहलक्ष्मी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर गिलू जोसेफ ही मॉडेल झळकली होती. ज्यात काहीच गैर नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती. तिच्या या मताशी आता न्यायालयही सहमत असल्याचं स्पष्ट झालं आहे.  ‘मातांनो केरळवासीयांना सांगा, कृपया रोखून पाहून नका आम्हाला स्तनपान करू द्या’ अशा ओळींसह ‘गृहलक्ष्मी’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील फोटोने सर्वांचच लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावरही या विषयाला बरीच चालना मिळाली होती.

मार्च महिन्याच्या आवृत्तीसाठीच्या मुखपृष्ठावरील या फोटोच्या विरोधात वकील विनोद मॅथ्यू विल्सन यांनी तो फोटो अश्लील आणि अशोभनीय असल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय त्या मासिकासोबतच त्यावर झळकणाऱ्या मॉडेलविरोधातही भारतीय दंडसंविधानात येणाऱ्या पोस्को, कलम ४५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

मासिकाविरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर अँटोनी डॉमिनीक आणि दामा शेषाद्री नायडू यांनी त्यांच्या निरीक्षणातून स्पष्ट केलं होतं की, भारतीय कलेमध्ये नेहमीच मानवी शरीराचं चित्रण करण्यात आलं आहे. आपल्याकडे त्याविषयीची उदाहरणंही आहेत, ज्यामध्ये कामसूत्र, राजा रवी वर्माची चित्र आणि अजिंठा लेण्यांमधील मूर्तीकलेची उदाहरणं पाहण्याजोगी आहेत. त्यामुळे त्या मासिकाच्या मुखपृष्ठावरुन झळकलेली कोणतीच गोष्ट ही अश्लीलतेकडे झुकणारी नव्हती, असंही स्पष्ट करण्यात आलं. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ‘गृहलक्ष्मी’ मासिकाकडून सुटकेचा नि:श्वास सोडण्यात आला आहे.