‘द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर हा चित्रपट आधारित आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर’च्या ट्रेलर आणि प्रोमोचे प्रदर्शन थांबवावे या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.

पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे माजी पंतप्रधान आणि देशांची प्रतिमा मलिन होत आहे त्यामुळे या ट्रेलरचे प्रक्षेपण रोखण्यात यावे अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारीत आहे.

या चित्रपटात चुकीची माहिती दाखवण्यात आली असून हा ट्रेलर दिशाभूल करणारा आहे असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. या ट्रेलरमधून सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या नियम ३८ चे उल्लंघन होत आहे असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी या याचिकेवर सुनावणी होईल.