पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादामध्ये सापडला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर चित्रपटात गीतकार जावेद अख्तर यांचं गाणं नसतांनाही श्रेय नामावलीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हा चित्रपट वादामध्ये सापडला आहे. दरम्यान, या वादावर निर्माते संदीप सिंग यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संदीप यांनी ट्विट करत जावेद अख्तर यांचं श्रेय नामावलीत नाव टाकण्याप्रकरणी खुलासा केला आहे.

‘पी.एम नरेंद्र मोदी’ या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील गाणी ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर आणि समीर यांनी लिहिल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे चित्रपटाच्या अधिकृत पोस्टरवर त्यांच्या नवाचा उल्लेखही करण्यात आला होता. मात्र आपण या चित्रपटातलं एकही गाणं लिहीलं नाही असं जावेद अख्तर आणि समीरने जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांच्या स्पष्टीकरणानंतर बराच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र त्यावर पडदा टाकत संदीप यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं आहे.

पीएम मोदी यांच्या बायोपिकमध्ये जावेद अख्तर यांनी लिहीलेल्या काही गाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.  ‘१९४७: अर्थ’ या चित्रपटातील ‘ईश्वर अल्लाह’ आणि ‘दस’ चित्रपटामधील ‘सुनो गौर से दुनियावालो’ ही गाणी चित्रपटात वापरण्यात आली आहेत. त्यामुळे आम्ही श्रेयनामावलीत त्यांच्या नावाचा समावेश केला होता, असं संदीप यांनी म्हटलं आहे.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाचं दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. हा बायोपिक ५ एप्रिलला प्रदर्शित होणार असून विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विवेकसोबतच बोमन इराणी, मनोज जोशी, झरिना वहाब हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत.