भारतीय क्रिकटपटू युवराज सिंग ३० नोव्हेंबरला ब्रिटिश-मॉरिशियन मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री हेजल कीच हिच्यासह विवाहबंधनात अडकणार आहे. युवराजने त्याच्या लग्नासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण दिल्याचे कळते. पण, आश्चर्यकारक बाब म्हणजे युवराजच्या लग्नाला त्याचे वडील योगराज सिंग हे उपस्थित राहणार नसल्याचे कळते. काही संकेतस्थळांनी दिलेल्या वृत्तानुसार योगराज हे त्यांच्या मुलाच्या लग्नात गैरहजर राहणार असल्याचे समजते.

युवराज आणि हेजलचे लग्न ३० नोव्हेंबरला पंजाब येथील फतेहगड साहेब गुरुद्वारा येथे होणार आहे. या कारणामुळे त्याचे वडील योगराज हे लग्नाला जाणार नसल्याचे समजते. योगराज यांनी याबद्दल युवराजच्या आईला सांगितले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मी देवाला मानतो पण, धर्मगुरुंना नाही. त्यामुळे ते या लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, २९ नोव्हेंबरला ललित होटेल येथे होणा-या मेहंदी आणि संगीत सिरेमनीत योगराज उपस्थित राहतील. तर दुसरीकडे, युवराजच्या आई शबनम सिंग या धार्मिक गुरु संत अजित सिंग हंसालीवाले यांच्या भक्त आहेत. त्यांचे हे गुरु फतेहगढ साहेब जवळ असलेल्या हंसाली गावात राहतात. लग्नानंतर युवराज आणि हेजल हे गुरुंच्या आशिर्वादासाठी तेथे जाणार असल्याचे कळते.

हेजल आणि युवराज यांचा गेल्यावर्षी ११ नोव्हेंबरला साखरपुडा झाला होता. पंजाब येथे ३० नोव्हेंबरला गुरुद्वारामध्ये लग्न केल्यानंतर २ डिसेंबरला गोवा येथे हिंदू विवाहपद्धतीनुसार त्यांचे लग्न होईल. या विवाहसोहळ्यासाठी काही ठराविक लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. यानंतर दिल्ली येथील आयटीसी मौर्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.