पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निवडणूक आयोगाने या चरित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती दिल्यानंतर आता त्याचा ट्रेलर युट्यूबवरून गायब झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती दिली आहे. विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

‘पीएम नरेंद्र मोदी’चा ट्रेलर फक्त युट्यूबवरूनच नाही तर इतर फ्लॅटफॉर्मवरूनही काढून टाकण्यात आला आहे. युट्यूबच्या सर्च बारमध्ये जरी चित्रपटाचं पूर्ण नाव टाकलं तरीही ट्रेलर दिसत नाही. ‘हा व्हिडिओ उपलब्ध नाही’, असा मेसेज युट्यूबवर येतो.

निवडणूक आयोगाने प्रदर्शनावर दिलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे हा ट्रेलर सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने आधी चित्रपट पाहावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. चित्रपट बघून त्याचा अभिप्राय बंद लिफाफ्यात २२ एप्रिलपर्यंत कळवावा असंही न्यायालयाने म्हटलं आहे.