अभिनेता विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट २४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी केवळ २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.

‘boxofficeindia.com’ नुसार, या चित्रपटाने देशात २.२५ ते २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ओमंग कुमार दिग्दर्शित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’  प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र तो प्रेक्षकांच्या पसंतीत म्हणावा तितका उतरला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेने पंतप्रधान मोदी आणि भाजपाचा स्वीकार केला. तर पीएम मोदी यांच्या बायोपिककडे पाठ फिरवत या बायोपिकला नाकारल्याचं दिसून आलं.

दरम्यान, या चित्रपटासोबतच अर्जुन कपूरचा ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ आणि हॉलिवूड चित्रपट ‘अलादीन’ प्रेक्षकांच्या भेटीला आले. या चित्रपटांपैकी ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटानेदेखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसून ‘अलादीन’ या चित्रपटाने मात्र ४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.