हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ‘फाईट मास्टर’ वीरु देवगण यांचे सोमवारी (२७ मे) निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजय देवगण यांची आई आणि वीरु देवगण यांच्या पत्नी विणा देवगण यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करत वीरु देवगण यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेलं पत्र अजय देवगणने नुकतंच सोशल मीडियावर शेअर करुन त्यांचे आभार मानले आहेत.

“हिंदी चित्रपटसृष्टीत वीरु देवगण यांनी अतिशय महत्वाचं योगदान दिलं होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले असून ही त्यांचं असं आपल्यातून जाणं हे अत्यंत दु:खद घटना आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी २८ तारखेला हे पत्र लिहिलं होतं.


वीरु देवगण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. याच आजारपणामुळे त्यांचे २७ मे रोजी निधन झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मि. इंडिया, मि. नटवरलाल, लाल बादशाह, हिम्मतवाला, शहेनशाह यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी अ‍ॅक्शन दिग्दर्शन केले होते. त्यांच्या पश्चात पुत्र अभिनेता अजय देवगण, अनिल देवगण, दोन मुली, सून काजोल आणि नातवंडे असा परिवार आहे.