पीएम नरेंद्र मोदी

रेश्मा राईकवार

प्रचंड विरोधानंतर ‘पीएम नरेन्द्र मोदी’ हा चित्रपट अशा क्षणी प्रदर्शित झाला आहे ज्यावर पुन्हा देशाचा तारणहार, प्रचंड बुद्धिवान, पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देणारा कडवा देशाभिमानी नेता म्हणून मोदी हे नाव कोरले गेले आहे. देशभर मोदी लाट पसरलेली असतानाच ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेन्द्र मोदी’ हा चित्रपट जनतेसमोर आला आहे. त्यामुळे चित्रपटातही भव्य पडदा व्यापून उरणारे एकच व्यक्तिमत्त्व असल्याने पडद्यावर आणि पडद्याबाहेर तुम्हाला मोदी, मोदी आणि मोदी.. एवढाच जयघोष ऐकू येतो. हा चित्रपट पाहताना एक तर तो सर्वगुणसंपन्न नेत्याचा चरित्रपट आहे, त्यामुळे त्यात वाईट किंवा नकारी असे काही घडूच शकत नाही, याची खूणगाठ पक्की बांधली पाहिजे. तरच तुम्हाला इतर कोणताही नकारी विचार शिवू शकणार नाही. या चित्रपटाने तुम्हाला ‘मोदी’ समजणार नाहीच कदाचित, पण नमोभक्तीत नक्कीच वाढ होईल.

२०१४ मध्ये नरेन्द्र मोदी पंतप्रधान म्हणून निवडून आले, तिथूनच या चित्रपटाची सुरुवात होते. एका चहावाल्याचा (गुप्ता) मुलगा नरेन्द्र जात्याच हुशार, देशाभिमानी आणि प्रेमळ. लहानपणापासूनच आदर्श विचारांच्या सान्निध्यात असलेला नरेन्द्र त्याच्या याच हुशारीमुळे आरएसएसचे प्रचारक वकील बाबू (यतीन कार्येकर) यांच्या नजरेत आले आणि त्यांनी नरेन्द्र मोदी यांच्यासमोर संघाचे कार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र पुढे जाऊन काय करायचे याबद्दल ठाम नसलेल्या मोदींनी संन्यासाचा मार्ग निवडला. घरदार सोडून दोन वर्षे हिमालयात असलेल्या मोदींना अखेर आपल्या आयुष्याचे ध्येय सापडले आणि ते थेट पुन्हा वकीलबाबूंसमोर प्रकट झाले. इथून पुढे पंतप्रधानपदाची शपथ घेईपर्यंतचा सगळा प्रवास एकामागोमाग एक घटनांचे बोट धरून प्रत्येक वेळी मोदी कसे जिंकले याचे चित्रण दिग्दर्शकाने केले आहे. मोदी यांच्या राजकीय आयुष्याचा पट पाहता सुरुवातीला संघबांधणीच्या काळात निर्णायक घटनांमध्ये त्यांनी केलेली कामगिरी त्यांना थेट भारतीय जनता पक्षाच्या तीन मोठय़ा नेत्यांच्या जवळ कशी घेऊन आली. मग पक्षातच मोदींना दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण फक्त काम करत राहायचे ही भूमिका घेऊनच पुढे आलेल्या मोदींनी प्रत्येक वेळी आलेले संकट खूप हुशारीने परतवून कसे लावले, हे अतिशय ठोकळेबाज पद्धतीने दिग्दर्शक मांडताना दिसतो. इंदिरा गांधी यांचे सरकार उलथून टाकण्यापासून ते गोध्रा-अक्षरधामसारख्या घटना मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी कशा एका उद्योजकाने घडवून आणल्या आणि अखेर मोदी यांना या सगळ्यातून क्लीन चिट मिळाली. मोदी यांच्याबद्दल सकारात्मकच विचार समोरच्याच्या मनात निर्माण होईल अशा पद्धतीनेच चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे.

मांडणीतच स्पष्टता असल्याने भूमिका पेलण्यासाठी सक्षम असलेल्या कलाकारांना घेऊन ते साकारणे हे काम दिग्दर्शक म्हणून ओमंग कुमार यांनी चोख बजावले आहे. बऱ्याच दिवसांनी मोठय़ा भूमिकेत प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेता विवेक ओबेरॉय याने प्रामाणिकपणे मोदी यांच्या लकबी, त्यांची देहबोली, उच्चारणासह ही भूमिका चोख करण्याचा प्रयत्न केला आहे. इतर भूमिकांविषयी फारसे बोलण्यात काही अर्थ नाही त्याचे कारण त्या सगळ्याच दुय्यम म्हणूनच प्रेक्षकांसमोर येतात. त्यातल्या त्यात नरेन्द्र मोदी आणि अमित शहा यांची प्रसिद्ध जोडी जयला वीरू मिळाला अगदी अशा शब्दांत दिग्दर्शकाने मांडली आहे. शहांची भूमिका मनोज जोशी यांनी केली आहे. इंदिरा गांधींच्या भूमिकेत किशोरी शहाणे आहेत. तर अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका अंजन श्रीवास्तव यांनी केली आहे. मात्र या सगळ्याच व्यक्तिरेखा तोंडी लावण्यापुरत्या आलेल्या असल्याने त्यांचा फारसा प्रभाव पडण्याचे कारणच दिग्दर्शकाने ठेवलेले नाही. त्यातल्या त्यात बोमन इराणी यांनी साकारलेली रतन टाटा यांची व्यक्तिरेखा आणि अगदीच छोटेखानी भूमिकेत असलेल्या अभिनेता सुरेश ओबेरॉय यांचा खर्जातला आवाज लक्षात राहतो.

नरेन्द्र मोदी हे सर्वगुणसंपन्न आणि आजवरचे प्रभावी नेते आहेत. नरेन्द्र मोदीनामक झंझावात जेव्हा गुजरातमध्ये मोठा होत होता तेव्हा विरोधी पक्षांनी चहावाला म्हणून त्याची हेटाळणी करत त्यांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विरोधक फसले. तर बाकीची सगळी लढाई मग ती भारतीय जनता पक्षातील त्यांच्याबद्दल वाढता असंतोष असेल किंवा गोध्रा हत्याकांडामुळे त्यांच्यावर लागलेले आरोप, अमेरिकेत जाण्यासाठी नाकारलेला व्हिसा या सगळ्या गोष्टींवर मोदी यांनी हुशारीने मात केली. त्यांनी समाजकारण केले म्हणूनच ते राजकारणात जिंकले, हा संदेश देण्याचा दिग्दर्शकाचा (?) प्रयत्न पडद्यावर जाणवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे आधी म्हटले त्याप्रमाणे मुळातच ज्याची कथा आपण ऐकतो आहोत ते महान व्यक्तिमत्त्व आहे हे मान्य केल्यानंतर त्याचा प्रवास हा त्याच पद्धतीने लोकांसमोर येणार. ‘पीएम नरेन्द्र मोदी’ हा चित्रपटही त्यांच्या त्याच प्रचारकी धोरणाचा भाग वाटतो, यात नवल नाही.

दिग्दर्शक – ओमंग कुमार

कलाकार – विवेक ओबेरॉय, मनोज जोशी, राजेंद्रकु मार गुप्ता, झरीना वहाब, किशोरी शहाणे