जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधात चळवळ पेटली आहे. या चळवळीमुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ माजली आहे. या आंदोलनाला हॉलिवूड कलाकारांसोबतच मनोरंजन क्षेत्रातील नेटफ्लिक्स, डिस्ने, वॉर्नर ब्रोस यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान पोकेमॉन कंपनीने चळवळीला आर्थिक पाठबळ देण्यासाठी तब्बल एक लाख अमेरिकी डॉलर्सची (७५ लाख ६० हजार रुपये) मदत जाहीर केली आहे.

“कृष्णवर्णीयांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी आम्ही या आंदोलनात भाग घेतला आहे. पोकेमॉन कंपनीत काम करणाऱ्या कृष्णवर्णीय कर्मचाऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. तसेच ‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ या चळवळीला आर्थिक पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही एक लाख अमेरिकी डॉलर्सची मदत जाहीर करत आहोत.” अशा आशयाचे ट्विट पोकेमॉन कंपनीने केले आहे. पोकेमॉनसोबतच टायटॅनिक फेम अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ आणि BTS या कोरिअन म्युझिक बँडने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

चळवळी मागंच कारण काय?

जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मृत्यू झाला. पोलिसांनी जॉर्जच्या मानेवर तब्बल नऊ मिनिटं पाय ठेवला होता. परिणामी मानेवर पडलेल्या अतिरिक्त दाबामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा थेट संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण अमेरिका पेटून उठली आहे. देशवासीयांनी करोना विषाणूची पर्वा न करता रस्त्यांवर येऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये अनेक मोठे कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू सामिल झाले आहोत.