प्रत्येक महिलेने सनी लिओनीसारखे असावे, असे ट्विट ऐन जागतिक महिला दिनी करणाऱ्या बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्मा याने महिलांचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

नेहमीच वादग्रस्त ट्विट करणाऱ्या राम गोपाल वर्माने काल महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काही ट्विट्स केले. जागतिक महिला दिनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झलक दाखवून देताना सनी लिओनीचा उल्लेख करुन त्याने महिलांना दिलेला संदेश हा कळीचा मुद्दा ठरला. प्रत्येक महिलेने सनी लिओनीप्रमाणे पुरुषांना आनंद द्यायला हवा, असे वादग्रस्त ट्विट रामूने केले होते. तसेच, महिलांपेक्षा पुरुषच हा दिवस अधिक उत्साहाने साजरा करत असल्याचे सांगत महिला दिन हा पुरुष दिन म्हणून साजरा करायला हवा, असे मत देखील त्याने मांडले. यानंतर नेटिझन्सकडून वर्मावर बरीच टीका करण्यात आली. ‘हिंदू ग्रुप हिंदू जनजागृती’ याच्या महिला शाखेशी जोडलेल्या प्रतीक्षा कोरगावकर यांनी राम गोपाल वर्मा विरुद्ध गोव्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला कायद्याअंतर्गत स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे महिलांचा अपमान करणाऱ्या दिग्दर्शकाविरोधात सायबर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच, राम गोपाल वर्माचे ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद केले जावे, अशी मागणीही प्रतीक्षा यांनी केली आहे. मात्र, यावर वर्मा याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वर्माच्या ट्विटवर टीका करणाऱ्यांना त्याने कालच प्रत्युत्तरही दिल्याचे पाहायला मिळाले होते. सनी लिओनीवरील माझ्या ट्विटवर अनेकजण अतिशय ढोंगीपणे नकारात्मक आवाज उठवत आहे. इतर कोणत्याही महिलेपेक्षा तिच्यामध्ये अधिक प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान आहे, असे ट्विट वर्माने केले होते. इतकेच नव्हे तर पॉर्न विश्वातून अभिनय क्षेत्राकडे वळलेल्या सनीवर लघुपट काढणार असल्याची घोषणाही वर्माने केली.