चेन्नईमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याच्यासोबतच आणखी आठजणांचं नावही या प्रकरणात गोवलं गेलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार आर. मुरलीधरन यांनी ही तक्रार केली आहे.

आपल्याला हृतिकचा २०१४ मध्ये अनावरण झालेल्या ‘एचआरएक्स’ या ब्रँडमध्ये ‘स्टॉकिस्ट’ म्हणून निवडण्यात आलं होतं, असं मुरलीधरन यांचं म्हणणं आहे. रोशन आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्याला २१ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर कंपनीने त्यांच्या उत्पादनांचा योग्य आणि ठरलेला पुरवठा केला नसल्याचंही ते म्हणाले आहेत. त्याशिवाय कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय त्यांनी ही कंपनी बंद केल्यामुळे पुढे कंपनीच्या उत्पादनांची विक्रीही झाली नाही. ज्यानंतर त्यांनी या वस्तू ज्यावेळी कंपनाकडे परत पाठवल्या तेव्हाही त्यांनी त्या उत्पादनांच्या बदल्यात मुरलीधरन यांना रक्कम देण्यास मनाई केली.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

मुरलीधरन यांच्या तक्रारीनंतर कोडुंगयूर पोलिसांनी या सर्व प्रकरणाविषयी भारतीय दंडसंहितेअंतर्गत येणाऱ्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल दाखल केला आहे.

दरम्यान, आता हृतिककडून या सर्व प्रकरणी काय उत्तर दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला तो आगामी चित्रपटाच्या तयारीत असून, विकास बहलने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘सुपर ३०’ असं या चित्रपटाचं नाव असून, जानेवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.