करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणात अभिनेता सोनू सूदने गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. रोजंदारीवर जगणाऱ्या शेकडो मजुरांना आणि विद्यार्थांना त्याने बस, ट्रेन व विमानाच्या माध्यमातून त्यांच्या गावी पोहोचवले. हे मदत कार्य सुरु असताना पोलिसांनी त्याच्या एका सहकाऱ्याला थोबाडीत देखील मारली होती. सोनूने हा धक्कादायक अनुभव ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितला.

‘द कपिल शर्मा शो’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका आहे. या मालिकेत पाहूणा म्हणून आलेल्या सोनूने गरिबांची मदत करताना आलेले विविध अनुभव सांगितले. त्यावेळी त्याने पोलिसांसोबत घडलेला एक धक्कादायक किस्साही सांगितला. तो म्हणाला, “मजुरांची मदत करण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली होती. या टीममधील प्रत्येक सदस्याला एक जबाबदारी सोपवण्यात आली होती. यामधील काही जण मदत मागणाऱ्या मजुरांकडे लक्ष ठेवतील, काही जण प्रवासाची जबाबदारी पार पाडतील, काही जण मजुरांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतील. असं कामाचं विभाजन करुन आम्ही आपली जबाबरादी पार पाडत होतो. दरम्यान माझ्या एका साथिदाऱ्याला पोलिसांनी थोबाडीत मारली. कारण मजुरांशी बोलताना त्याने आपल्या तोंडावरील मास्क काढला होता. परंतु पोलिसांचा मार खावूनही तो शांत राहिला व त्याने आपली जबाबदारी पार पाडली.” असा अनुभव सोनू सूदने सांगितला.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.