अभिनेता सलमान खान याचा विश्वास

क्षयरोगाने आजारी असलेली अभिनेत्री पूजा डडवाल लवकर बरी होईल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याने शनिवारी व्यक्त केला.

‘वीरगती’ चित्रपटात सलमान खान याच्यासमवेत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या पूजा डडवाल हिची आर्थिक स्थिती हलाखीची असून सध्या ती रुग्णालयात उपचार घेत आहे. सलमान खान मला मदत करेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली असून पूजा हिचा व्हिडीओ समाज माध्यमांवर ‘व्हायरल’ झाला आहे. त्या संदर्भात विचारले असता सलमान खान याने ‘पूजा हिच्या आजारपणाबद्दल मला समजले असून मी तिला मदत करणार आहे,’ असे सांगितले. पूजा सध्या आयुष्यातील खडतर काळातून जात आहे. मात्र, ती लवकरच बरी होईल, असा विश्वास सलमान याने व्यक्त केला. या चित्रपटामध्ये ती अतुल अग्निहोत्री याची नायिका होती, असे त्याने सांगितले.

गीत आणि नृत्याचा मिलाफ असलेला अभिनेता सोहेल खान निर्मित ‘दबंग’ या रंगमंचीय कार्यक्रमासाठी आलेल्या सलमानने पुणे हे माझे आवडते शहर असल्याचे सांगितले. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेझी शहा, अभिनेता प्रभुदेवा, मनीष पॉल आणि गायक गुरु रंधावा यांचा सहभाग होता.