कॉलेज आठवणींचा कोलाज : श्रेया बुगडे, अभिनेत्री

मी मिठीबाई महाविद्यलय विलेपार्ले येथून माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. समाजशास्त्रात मी पदवी मिळवली. कॉलेजचा पहिला दिवस थोडासा विचित्र होता. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात व इतर शालांतर कार्यक्रमात मी अग्रेसर असल्याने टीचिंग नॉनटीचिंग स्टाफ मला ओळखत होता. कॉलेजमध्ये मला तसं कोणीच ओळखत नव्हतं त्यामुळे घरी येऊन मी ढसाढसा रडले. तेव्हा कॉलेजमध्ये रॅगिंग हा प्रकार व्हायचा. आईला वाटलं माझ्यावर रॅगिंग झालंय म्हणून मी रडतेय. पण तिला जेव्हा कळालं की मी या कारणाने नाही, मला कोणी ओळखत नाही म्हणून रडतेय तेव्हा ती हसतच सुटली. पहिला दिवस असा माझा रडारडीत गेला. नंतर नंतर कॉलेजमध्ये मी रुळायला लागले. टॅलेंट सर्चमध्ये मी भाग घेतला व तिथून नाटय़ विभागात दाखल झाले. ते पुढील पाच वर्षांसाठीच.

मी लेक्चरला कमी आणि नाटय़ विभागात जास्त असायचे. एके दिवशी मला प्राचार्यानी भेटायला बोलावलं व सांगितलं की, आपल्या कॉलेजमधून करिना कपूर पासआऊट झाली आहे. तुझ्यातला अभिनयाचा कीडा तू मारू नकोस. आपल्या कॉलेजच्या सर्व स्पर्धामध्ये सहभागी हो व पुढे जा. त्यांचा हा संदेश माझ्यासाठी मोलाचा होता. त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याच एकांकिका केल्या. शेवटच्या वर्षांला असताना केलेली रबडी एकांकिका ही विशेष आहे. १३ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत ही एकांकिका उतरली व प्रत्येक स्पर्धेत मला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. १३ बक्षिसे मी एकाच एकांकिकेतून मिळवली. सत्य घटनेवर आधारित या एकांकिकेत मी सरोगेट मदरची भूमिका साकारली. तिला पहिली मुलगी होते. जी शारीरिक दुर्बळ व मतिमंद असते. जी पूर्ण एकांकिकेमध्ये माझ्या खांद्यावर असते. आमच्या कॉलेजमधून या मुलीच्या रोलसाठी किडकिडीत मुलगी हवी होती. जी आम्हाला सापडतच नव्हती. शेवटी अकरावीतला एक किडकिडीत म्हणजे फुंकर मारली तरी उडून जाईल असा मुलगा त्या रोलसाठी आम्ही निवडला. आणि त्याला ४५ मिनिटं अखंड खांद्यावर घेऊन मी एकांकिका सादर केली. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.

मी मारवाडी भाषेतलं नाटकसुद्धा केलं आहे. मनुस्मृती नावाचं ते नाटक होतं ज्याला इफ्तामध्ये पहिला क्रमांक मिळाला. आमचे प्राचार्य तेव्हा कॅम्पसमध्येच राहायचे. त्यांनी आम्हा सर्व मुलांना सांगून ठेवलं होतं की कितीही उशीर झाला तरीही घरी यायचं. रात्री २ वाजता आम्ही मोकळे झालो व त्यांच्या घरी गेलो. त्यांनी आमच्यासाठी आइस्क्रीम आणलं होतं. जे रात्री ३ वाजेपर्यंत खात आम्ही त्यांच्या घरी बसलो होतो.

मला कॉलेजमध्ये मैत्रिणींपेक्षा मित्रच जास्त होते. रात्री अपरात्री मला माझे मित्र बाइकवरून सुखरूप घरी सोडायचे. आईला बाइकची भीती वाटायची. ती नेहमी मला ओरडायची, पण मी काही ऐकायची नाही. मी कॉलेजमध्ये लेक्चर बंक करायचे. आम्ही मास बंकसुद्धा करायचो. कॉलेजमध्ये असताना मी खूप खवय्येगिरी केली आहे. कॉलेजच्या समोरच मोठी खाऊगल्ली आहे. जिथे अमिताभ-अभिषेक बच्चन, पंकज कपूर गाडय़ा थांबवून पार्सल घेऊन जातात. डोसा, सॅण्डविच आणि वडापाव स्वादिष्ट मिळतो. माझी बहीणही याच कॉलेजमध्ये होती. आजही आम्ही दोघी तिकडे जातो व खाबूगिरी करतो. कॉलेजचा शेवटचा दिवस हळवा वगैरे करणारा नव्हता. मी कॉलेज लाइफ जगून संतुष्ट होते. आजही मला कॉलेजमध्ये परीक्षक, प्रमुख पाहुणी म्हणून बोलवतात व मी आवर्जून जाते.

शब्दांकन : मितेश जोशी