मराठी रुपेरी पडद्याला विनोदी चित्रपटांची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक दिग्गजांनी उत्तमोत्तम विनोदपटांची निर्मिती केली आहे. ‘पोश्टर बॉईज’ हा चित्रपट या विनोदपटांच्या परंपरेत चपखल बसणारा आणि धमाल मनोरंजन करतानाही सहजपणे विशिष्ट संदेश देण्यात यशस्वी ठरलेला चित्रपट आहे. दिग्दर्शकांचा पहिलाच प्रयत्न असूनही त्यांनी या पहिल्याच चित्रपटात बाजी मारली आहे, हे आवर्जून नमूद करावे लागेल. उत्तम कलावंतांची फळी, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करूनही संदेश देणारा हा चित्रपट यशस्वी झाला आहे.
वृद्ध आबा म्हणजे जगन देशमुख, मध्यमवयीन सदानंद कुलकर्णी मास्तर आणि अर्जुन जगताप हा तरुण असे तिघे वेगवेगळ्या वयोगटांतले, पण वडनेर या एकाच गावचे रहिवासी. तिघांचे स्वभाव भिन्न, जगण्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन निरनिराळे, परंतु आरोग्य विभागाच्या बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया प्रसारासाठी तयार केलेल्या पोस्टरवर तिघांची छायाचित्रे झळकतात आणि तिघांचे आयुष्यच बदलून जाते. मग अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तिघे सरकारविरुद्ध लढा देतात.
ग्रामीण महाराष्ट्रातील वडनेर हे गाव, तेथील लोक, जत्रा, जत्रेत फोटो काढण्याची हौस याचे उत्तम चित्रण करीत दिग्दर्शकाने गाव उभे केले आहे. जत्रेतले गाणेच सुरुवातीला घेऊन त्यातून अर्जुन जगताप, त्याची प्रेयसी दाखविल्याने सुरुवातीपासूनच या चित्रपटात पुढे काय होणार याचा अंदाज बांधायला प्रेक्षक सुरुवात करतात. नसबंदी शस्त्रक्रिया, त्याच्याशी संबंधित मिथके, समज-गैरसमज याबाबत ग्रामीण भागांतील लोकांचा दृष्टिकोन हे सारे अचूक हेरून लेखकद्वयांनी पटकथा अफलातून लिहिली आहे.
पोस्टरवरील छायाचित्रामुळे आबांच्या मुलीचे लग्न मोडते, तर मास्तर सदानंद कुलकर्णी यांची बायको त्यांना सोडून जाते, तर अर्जुनची प्रेयसी त्याच्याशी लग्न करण्यास नकार देते. वडनेर, टाकळी, धानोरा अशा आसपासच्या सर्व गावांमध्ये पोस्टर झळकल्यामुळे होणारी पुरुषी मानसिकतेची गोची आबा, मास्तर आणि अर्जुनच्या व्यक्तिरेखांमधून नेमकेपणाने दिग्दर्शकाने दाखवली आहे.
अर्जुन, आबा देशमुख आणि मास्तर सदानंद कुलकर्णी तिघेही आपापल्या परीने वल्ली आहेत हे सहजपणे दाखविले आहे. दिलीप प्रभावळकर आणि हृषीकेश जोशी यांचा अस्सल अभिनय आणि त्यांना अनिकेत विश्वासरावनेही चांगली साथ देत धमाल उडवून दिली आहे. मास्तर म्हणून शिकवितानाचा हृषीकेश जोशी यांचा अभिनय वाखाणण्याजोगा नक्कीच आहे. नेमकी पटकथा, मूळ विषयापासून कुठेही न भरकटतासुद्धा प्रेक्षकांची निखळ करमणूक चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत करण्याची लेखन-दिग्दर्शनाची किमया या चित्रपटात पाहायला मिळते.
दिलीप प्रभावळकरांपासून ते नेहा जोशी, उदय सबनीस, भारत गणेशपुरे, अश्विनी काळसेकर आदी सर्वच कलावंतांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे सामथ्र्य आहेच. त्याचबरोबर आवश्यक तिथेच संगीत, गाणी यामुळेही चित्रपट कंटाळवाणा अजिबात होत नाही.
खरे तर चित्रपटाचा विषय सवंग विनोदाकडे झुकणारा असूनही तो निखळ विनोदाच्या अंगाने मांडण्यातले दिग्दर्शकाचे कसब लाजवाब आहे. आरोग्य विभागातील तद्दन सरकारी अधिकारी भारत गणेशपुरे यांनी चांगला साकारला आहे.
विषयाच्या अनुषंगाने सहजगत्या होणारा विनोद अजिबात ओढाताण न करता पटकथालेखक द्वयांनी मांडला आहे. अनिकेत विश्वासरावनेही इंग्रजी शब्दांची चुकीची फेक करीत साकारलेला गावरान रांगडा अर्जुन तोडीस तोड म्हणावा लागेल.
अ‍ॅफ्लुअन्स मुव्हिज प्रा. लि. प्रस्तुत
पोश्टर बॉईज
निर्माते – दीप्ती तळपदे, श्रेयस तळपदे
दिग्दर्शक – समीर पाटील
कथा-संवाद – समीर पाटील
पटकथा – समीर पाटील, चारुदत्त भागवत
संगीत – लेझ्ली लुईस
छायालेखक – पुष्पांक गावडे
कलावंत – दिलीप प्रभावळकर, हृषीकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, भारत गणेशपुरे, उदय सबनीस, नेहा जोशी, उमा सरदेशमुख, पूजा सावंत, सुहास परांजपे व अन्य.