विनोद सातव

करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आणि गेल्या आठ महिन्यांपासून एकपडदा, बहुपडदा चित्रपटगृहांची दारे बंद झाली. मागील काही महिन्यांत आपण छोटय़ा पडद्यावर नवे-जुने चित्रपट आणि इतर अनेक गोष्टी पाहात मनोरंजनाची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठय़ा पडद्याची मजा काही औरच असते हे या काळात प्रकर्षांने जाणवले. आता ५० टक्के आसनक्षमतेत नाटय़गृह, एकपडदा चित्रपटगृहे आणि बहुपडदा चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजनविश्वाला मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बहुपडदा चित्रपटगृहांनीही जुने का होईना चित्रपट दाखवायला सुरुवात केली आहे. खरे तर, या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अपेक्षेनुसार  दिवाळीत आणि नंतरच्या दोन आठवडय़ांत कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही; परंतु या आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘टेनेट’ या हॉलीवूडपटाला पुणे, मुंबईसह इतर शहरांत चांगले बुकिंग मिळाले आहे, प्रेक्षकांचा टक्का वाढत असल्याने हिंदीच नाही तर मराठी चित्रपटविश्वातही सकारात्मक वातावरणनिर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य शासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नव-नित्य (न्यू नॉर्मल) काळात नाटय़गृह, चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली, मात्र या काळात ‘सूरज पे मंगल भारी’ हा नवीन हिंदी चित्रपट वगळता एकही नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यामुळे वितरक आणि बहुपडदा चित्रपटगृह चालकांनी हिंदी, इंग्रजी, मराठी जुने सुपरहिट चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचे ठरवले, यामध्ये ‘मुळशी पॅटर्न’, ‘हिरकणी’, ‘फत्तेशिकस्त’, ‘चोरीचा मामला’, ‘टकाटक’, ‘नटसम्राट’ आदी मराठी चित्रपट नव्याने प्रदर्शित झाले. या वेगळ्या प्रयोगाला पहिल्या आठवडय़ात तरी प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु दिवाळीचा माहौल संपल्यानंतर बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती तुलनेने वाढली आहे. तसेच दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्यात १३ ठिकाणी प्रदर्शित झालेला ‘मुळशी पॅटर्न’ शुक्रवारी पुण्यातील तीन बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला आहे. एकीक डे करोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी जोरदार चर्चा सुरू झाली असली तरी त्या तुलनेने रुग्णसंख्या वाढलेली नाही याचा ‘सकारात्मक’ परिणाम काही प्रमाणात का होईना तिकीटबारीवरही हळूहळू दिसू लागला आहे.

करोनानंतरच्या या काळात चित्रपटगृहांपर्यंत प्रेक्षकांना आणणे हेच या क्षेत्रासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यात एकीकडे प्रेक्षक हळूहळू का होईना धाडसाने चित्रपटगृहांपर्यंत येत आहेत, हे लक्षात घेऊनही मराठी चित्रपट निर्माते त्या वेगाने पुढे सरसावलेले दिसत नाहीत. याचे कारण आत्ताच्या काळातही मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर चित्रपटाला अधिकाधिक शोज आणि प्राइम टाइम मिळणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांना बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये प्राइम टाइम किंवा शोज मिळाले नाहीत म्हणून निर्मात्यांना आंदोलन करावे लागले. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. यामध्ये आता आणखी मोठय़ा संकटाची भर पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत, ते संकट म्हणजे राज्यातील १०  ते १५ टक्के एकपडदा चित्रपटगृहांच्या अस्तित्वाचा निर्माण झालेला प्रश्न. बहुपडदा चित्रपटगृहांच्या आगमनापासूनच एकपडदा चित्रपटगृहे संकटांचा सामना करत आहेत त्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अधिकची भर पडली होती, आता करोना त्यांच्या अस्तित्वाची कसोटी पाहणारा ठरला आहे. यामुळे आगामी काळात एकपडदा चित्रपटगृहांची संख्या घटली तर मराठी चित्रपटसृष्टीला एका नव्या आव्हानाचा सामना करावा लागणार हे निश्चित.

एकंदरीत करोना संकटातून सावरताना मराठी चित्रपटसृष्टीला विविध पातळ्यांवर अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ या न्यायाने ‘आधी प्रेक्षक की आधी नवीन चित्रपट’ हा संभ्रम काही लोकांच्या मनात कायम असला तरी पहिल्या आठवडय़ात बोटावर मोजण्याइतपत असलेली प्रेक्षक संख्या संथपणे का होईना वाढते आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती मागे सारून ‘टेनेट’च्या निमित्ताने बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे, पुण्या-मुंबईतील चित्रपटगृहांमध्ये थेंबे थेंबे वाढत असलेली प्रेक्षकसंख्या मराठी चित्रपट निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटगृह मालक आणि मनोरंजनविश्वाशी निगडित सर्वच घटकांना भविष्यातील सकारात्मक वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारी आणि चित्रपटसृष्टीचे अर्थचक्र ‘न्यू नॉर्मल’ करणारी ठरणार यात शंका नाही.

२०२० चा विचार केला तर जानेवारी ते मार्च या कालावधीत फक्त २७ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आगामी काळात  ‘झी स्टुडिओज’चा ‘पांघरूण’, राहुल देशपांडे यांचा ‘मी वसंतराव’, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘जंग जौहर’, अभिनेता अंकुश चौधरीचा ‘दगडी चाळ २’, महेश मांजरेकर यांचा ‘दे धक्का २’, ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे यांचा ‘मीडियम स्पाईसी’, अभिनेत्री सायली संजीवचा ‘बस्ता’, सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिटय़ूट ऑफ पावटॉलॉजी’ यासह सुमारे ४५ चित्रपट पूर्णपणे तयार आहेत, तर पूर्णत्वाच्या मार्गावर असलेले १५ असे एकूण अंदाजे ६० मराठी चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहेत. यापैकी ‘डार्लिग’, ‘लॉ ऑफ लव्ह’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी २०२१ मधील प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्रेक्षकांची ही वाढती संख्या कायम राहील अशी अपेक्षा बाळगत डिसेंबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ातही काही निर्माते आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती चित्रपट वितरकांनी दिली.

(लेखक माध्यम सल्लागार आहेत)