मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत दिग्दर्शक गजेंद्र अहिरे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. स्मित गानू आणि विनय गानू यांची निर्मिती असलेला ‘पोस्टकार्ड’ हा चित्रपट येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमध्ये आधीच पोस्टकार्डला पसंती मिळाली आहे.
१९६५ ते ७० या दरमानच्या काळाचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. एका पोस्टमनला नोकरी करताना आलेला अनुभव हा या चित्रपटाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. घरोघरी पत्र टाकताना लोकांची दुःख, आनंद याचा अनुभव पोस्टमनलाही येत असतो. त्यातील तीन घटनांचा साक्षीदार ठरलेल्या, त्यात गुंतलेला पोस्टमन, त्या घटनांमधून त्याला मिळालेली जीवन समृद्धता याचे चित्रण या चित्रपटातून करण्यात येत आहे. रुपक कथा ह्या फॉर्ममध्ये ‘पोस्टकार्ड’ चित्रपटाचे सादरीकरण करण्यात येत आहे. जे मानवी भावनांचा गुंता आणि नियतीची अढळता यातून काही भाव्याकूळ माणसं या कथेत समोर येतात.
या चित्रपटाचे दिगदर्शन, कथालेखन, संवादलेखन आणि गीतलेखन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे. तर कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, सुबोध भावे, सई ताम्हणकर, विभावरी देशपांडे, राधिका आपटे, सुहिता थत्ते, वैभव मांगले यांचा समावेश आहे. चित्रपटातील गाण्यांना हरिहरन, कविता कृष्णमूर्ती नंदिनी श्रीकर यांचा आवाज लाभला आहे.