“पालवी क्रिएशन्स’च्या ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ह्या सामाजिक-कौटुंबिक चित्रपटाचे निर्माते म्हणून नाना पेठेतील विशाल धनवडे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यांच्या ह्या चित्रपटाच्या मुहूर्ताचं चित्रीकरण बाप्पाच्याच चरणी झालं आहे. श्री गजाननाच्या कृपेने येत्या २४ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. आता ह्या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवातही पुण्यातल्या अखिल मंडई मंडळाच्या ‘शारदा गणपतीच्या’ महाआरतीने करण्यात आली.
पुण्यातील मानाच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष मा. अशोकराव गोडसे, अखिल मंडई मंडळाचे पदाधिकारी श्री संजय मते,केसरी गणेशोत्सवाचे मा. रोहित टिळक, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’चे निर्माते विशाल धनवडे, चित्रपटाचे दोन्ही दिग्दर्शक नितीन चव्हाण – योगेश जाधव, चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील प्रसिद्ध कवी आणि अभिनेता संदीप खरे, अभिनेत्री दिप्ती भागवत, बाल अभिनेत्री श्रीया पासलकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या श्री शारदा गजाननाच्या महाआरतीस वरूणराजानेही हजेरी लावत आशीर्वाद दिला. तसेच सिनेमाच्या प्रिंटचे, श्री चरणी पूजन करण्यात आले. महापौरांच्या हस्ते चित्रपटाच्या पोस्टरचे तर गोडसे यांच्या हस्ते सिनेमाच्या प्रोमोचे लॉंचिंग करण्यात आले.
दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले की, प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट द्यावा ही मनात इच्छा होती, मसालापटाच्या भाऊगर्दीचा भाग मला व्हायचे नव्हते यामुळे वेगळ्या कथेच्या शोधात होतो. नितीन चव्हाणची ‘ओझं’ ही एकांकिका पुरुषोत्तम करंडकामध्ये पहिल्या नऊ मध्ये आली होती, बाप आणि मुलीचे नाते सांगणारी ही कथा थेट मनाचा ठाव घेणारी आहे. टिपीकल क्‍लिशे होऊ नये याची आम्ही पुरेपुर काळजी घेतली आहे. आज आपल्या भोवतालची परिस्थिती बघितली की जाणिव होते आम्ही योग्य विषय चित्रपटातून हाताळला आहे. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हा फक्त चित्रपट नव्हे तर सामाजिक विचार आहे. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्यातून बाबाची व्यथा मांडली होती आता या चित्रपटाच्या माध्यमातून त्याहीपुढे जाऊन या खूप काही सांगण्याचा प्रयत्न केल्याचे अभिनेते संदिप खरे यांनी सांगितले. बाबा, हा न बोलणारी आई असतो, आई एवढचं प्रेम, काळजी त्यालाही असते. एका गाण्यातून तयार झालेला हा पहिलाच सिनेमा आहे. समाजात जे काही अनुचित प्रकार होत असतात त्यावर भाष्य करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे वाटते. समाजात एक टक्का बदल झाला तरी ते आमचे यश असेल, पहिल्यांदाच मध्यवर्ती भूमिका साकारत असून सहकलाकांराकडून बरेच काही शिकायला मिळाल्याचे संदिप खरे यांनी नमुद केले.
damlelya-1