दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची १४ जूनला पहिली पुण्यतिथी होती. एक वर्ष पूर्ण झालं तरी सुशांतच्या मृत्यूचं गुढ उकलेलं नाही. सुशांतच्या मृत्यूबाबत सीबीआय आणि एनसीबीकडून तपास सुरू आहे. अशातच त्याच्या मृत्यूवर आधारित ‘सुसाईड’ ही वेब सीरिज लवकरच भेटीला येणार आहे. नुकतंच या वेब सीरिजचं पोस्टर लॉंच करण्यात आलंय.

काही दिवसांपूर्वीच सुशांतचे वडील के के सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सुशांतवर आधारित चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पण न्यायायालानं त्यांची ही मागणी नाकारली. त्यानंतर आता सुशांतच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत त्याच्या मृत्यूवर आधारित असलेल्या ‘सुसाईड: हकीकत या षडयंत्र’ या वेब सीरिजचं पोस्टर लॉंचिंग करण्यात आलंय. या वेब सीरिजचे दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत हा पोस्टर लॉंचिंग सोहळा पार पडला. ही वेब सीरिज सुशांत सिंह राजपूतच्या जन्मदिनी म्हणजेच येत्या २१ जानेवारी २०२२ मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

या सीरीजमध्ये अभिनेता आर्यपुत्र मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. आर्यपुत्र याने याआधी छत्तीसगडचे प्रथम शहीद वीर नारायण सिंहजी यांच्यावर आधारित चित्रपटात वीर नारायण सिंहची भूमिका करत बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं आहे. लॉकडाउनमध्ये या वेबसीरिजसाठी काम सुरू करण्यात आलं होतं. यासाठी अनेक लेखक, क्राइम रिपोर्टर आणि पत्रकारांकडून उपयुक्त माहिती मिळवून त्यांच्या चर्चा केल्या आणि त्यातून ५-६ सीन्स कट करण्यात आले आहेत, असं या वेब सीरिजचे लेखक अविनाश बावनकर यांनी सांगितलं.

अविनाश बावनकर हे या वेब सीरिजचे लेखक तसंच दिग्दर्शक देखील आहेत. तर आदित्य गर्ग हे या सीरिजचे निर्माते आहेत. या सीरिजमध्ये शशांक नावाचं काल्पनिक पात्र दाखवण्यात येणार आहे जे सुशांतवर आधारित आहे. एकूण आठ एपिसोडमध्ये ही वेब सीरिज दाखवण्यात येणार असल्याचं देखील बोललं जातंय.