‘बाहुबली’ सिनेमाने प्रभासला यशाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. भारतासह जगभरात प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली. प्रभासमुळे त्याच्यासोबत काम करणाऱ्यांचीही चर्चा होऊ लागली. आता हेच पाहा ना प्रभाससोबत काम केलेल्या रिचा गंगोपाध्यायची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्याचे कारणही खासच आहे म्हणा… रिचाने तिच्या बालपणीच्या मित्रासोबत अमेरिकेत लग्न केले. अमेरिकेत जवळच्या मित्रपरिवाराच्या साक्षीने रिचाने लग्न केल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबद रिचाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. २०१३ मध्ये ‘मिर्ची’ या तेलगू सिनेमात ती प्रभाससोबत झळकली होती.

रिचा योगायोगानेच सिनेसृष्टीत आली. २०१२ मध्ये ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. तमिळ अभिनेता सुंदर रामूच्या ‘मयक्कम एना’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सेटवर रिचाचा छळ होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सुंदर रामू आणि रिचा ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण त्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. सुंदर रामू तिचा फार चांगला मित्र असल्याचे तिने सांगितले होते. पण त्यानंतर २०१३ मध्ये रिचाने सिनेसृष्टीला कायमचे अलविदा म्हटले. पण आज तिच्या लग्नाच्या बातमीने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रिचाने अमेरिकेत ‘ऑलिन स्कुल ऑफ बिझनेस’ (वॉशिंगटन युनिव्हर्सिटी) येथून एमबीएची डिग्री घेतली आहे. सध्या ती मिशिगन येथे राहत आहे.