दक्षिण भारत हा सिनेवेड्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या भागातील चाहते सिनेकलाकारांसाठी अक्षरश: वेडे असतात असे म्हटले जाते. या चाहत्यांचे कलाकारांवर इतके प्रेम असते की, त्यांच्या आवडत्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दूधाने चित्रपटाच्या पोस्टरवर अभिषेक करणे, चित्रपटाच्या यशासाठी सामूदायीक पूजा करणे, ७०-८० फूटांचे पोस्टर उभे करणे यांसारखे प्रकार दक्षिण भारतात सर्रास घडतात. या प्रकारात आता आणखीन एका नव्या प्रकाराची भर पडली आहे. सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट पाहता यावा यासाठी चाहत्यांनी चक्क २४ तास सिनेमागृह खुले ठेवण्याचे आवाहन आंध्रप्रदेश सरकारला केले आहे.

बाहुबली फेम प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी चाहते अक्षरश: पाच-पाच किलोमीटरच्या रांगा लावत आहेत. परंतु सिनेमागृहांमध्ये एका दिवसात जास्तीत जास्त सहा ते सातच शो सादर केले जातात. त्यामुळे वेळेच्या अभावी ज्या प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची संधी मिळत नाही, त्यांच्यासाठी आणखीन दोन वाढीव शोची मागणी चाहत्यांनी केली. त्यांनी रात्री १ ते सकाळी १० दरम्यान दोन वाढीव शोची मागणी करणारा विनंती अर्ज आंध्रप्रदेश प्रशासनाला केला आहे. ही मागणी सध्या तरी केवळ ‘साहो’ या चित्रपटापुरतीच मर्यादीत आहे. सिनेमागृहांमध्ये शेवटचा शो सर्वसाधारणपणे रात्री ११ ते १चा असतो. परंतु जर ही मागणी सरकारने मान्य केली तर मालकांना सिनेमागृह २४तास खुले ठेवावे लागतील. आंध्रप्रदेश सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नाही.

असाच काहीसा प्रकार याआधी १९९७ साली ‘टायटॅनिक’ या हॉलिवूडपटाच्या वेळी घडला होता. त्यावेळी प्रेक्षकांच्या मागणी खातर सिनेमागृह २४ तास खुले ठेवण्यात आले होते. परंतु या प्रकारामुळे चित्रपटांची रिल घासून घासून तुटल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्या होत्या.