17 November 2017

News Flash

माधुरी दीक्षित पुन्हा एकदा नाचणार प्रभुदेवा सोबत

काही वर्षांपूर्वी झळकलेल्या ‘पुकार’ या चित्रपटात प्रभुदेवासोबत माधुरी दीक्षित नृत्य करताना प्रेक्षकांनी पाहिली होती.

प्रतिनिधी | Updated: November 25, 2012 12:25 PM

काही वर्षांपूर्वी झळकलेल्या ‘पुकार’ या चित्रपटात प्रभुदेवासोबत माधुरी दीक्षित नृत्य करताना प्रेक्षकांनी पाहिली होती. आता मोठय़ा कालावधीनंतर पुन्हा एकदा माधुरी प्रभुदेवासोबत नृत्य करताना चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रभुदेवा आणि रेमो डिसूझा या नृत्य दिग्दर्शक, नृत्य प्रशिक्षकांचे नृत्यवेड आता रिअ‍ॅलिटी शोपुरते मर्यादित राहिलेले नाही. कुणीही नाचू शकतो असा त्यांचा विश्वास असावा. म्हणूनच की काय यूटीव्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘एबीसीडी’ म्हणजेच ‘एनीबडी कॅन डान्स’ नावाचाच चित्रपट हे दोघे बनवित आहेत. दिग्दर्शक म्हणून रेमो डिसूझा मोठय़ा पडद्यावर पदार्पण करीत आहे. प्रभुदेवा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून नृत्याविष्कारामध्ये तो आणि माधुरी यांचे एकत्रित नृत्य पाहायला मिळणार आहे. नृत्य याच विषयाभोवती चित्रपटाचे कथानक असून चित्रपटाच्या शीर्षकातूनच प्रेक्षकाला त्याची जाणीव होईल. डान्स इंडिया डान्स या रिअ‍ॅलिटी शोचे विजेते कलावंत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असून आता चित्रपटाचे शेवटचे चित्रीकरण सत्र लवकरच पूर्ण केले जाणार आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि अभिनेता के के मेनन हेही या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आठ फेब्रुवारी २०१३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
माधुरी दीक्षितचे स्मितहास्य जितके लोकांना आवडले, तिचा अभिनय जितका आवडला त्यापेक्षाही तिचे नृत्यकौशल्य पाहण्यासाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळले.
आता अमेरिकेतून परतल्यापासून झलक दिखला जा या नृत्य रिअ‍ॅलिटी शोमध्ये टीव्हीवरून माधुरीला लोकांनी पाहिले असले तरी चित्रपटाच्या रूपेरी पडद्यावर अद्याप पाहिलेले नाही. या चित्रपटाद्वारे आपले नृत्यकौशल्य, अदा याचे दर्शन माधुरी दीक्षित प्रेक्षकांना घडविणार आहे.    

First Published on November 25, 2012 12:25 pm

Web Title: prabhudeva and madhuri dixit on once again dance together