सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी काही दिवसापूर्वी करोनाविषयी एक अजब वक्तव्य केलं होतं. ‘लिंबू वापरुन करोना विषाणूला पळवा’, असं विचित्र विधान त्यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकादेखील केली होती. मात्र आता याच प्रकाश राज यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी त्यांच्या स्टाफला मे पर्यंत अॅडव्हान्स पगार दिला आहे.

प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर करत, मी माझ्या स्टाफला मेपर्यंतचा अॅडव्हान्स पगार दिल्याचं सांगितलं.  विशेष म्हणजे चित्रपटांचं चित्रीकरण रखडल्यामुळे प्रकाश राज यांचे तीन चित्रपटांचं कामदेखील अर्ध्यावर राहिलं आहे. मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी त्यांच्या कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

“मी माझा राखीव निधी किती आहे हे पाहिलं. त्यानंतर माझ्या शेतात काम करणारे, चित्रपट निर्मिती संस्था, फाऊंडेशन आणि माझ्या घरात काम करणाऱ्या सगळ्या स्टाफला मी मुद्दाम मे पर्यंतचा अॅडव्हान्स पगार दिला आहे. सध्या आपल्याकडे जे सुरु आहे, त्यामुळे माझ्या तीन चित्रपटांचं काम रखडलं आहे. मात्र या तिन्ही चित्रपटांसाठी रोज काम करणाऱ्या कामगारांना निदान अर्धे वेतन तरी मिळावी यासाठी मी काही उपाययोजना केल्या आहेत. मला एवढ्यावरच थांबायचं नाहीये. मला जेवढं शक्य होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न मी करेन. तसंच आपल्यापैकी कोणाला इतरांना मदत करणं शक्य असेल तर त्यांनीदेखील जरुर मदत करा”, असं प्रकाश राज म्हणाले.

वाचा : CoronaVirus : दिलासा! चित्रीकरण बंद तरीही कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन

दरम्यान, चीनमधून फैलाव झालेल्या करोना विषाणूने भारतात चांगलेच हातपाय पसरले आहेत. सरकार शक्य तेवढी खबरदारी बाळगत नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करत आहे. करोनामुळे अनेक ठिकाणचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. मात्र काही सेलिब्रिटी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे आर्थिक मदत करत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रशांत दामले यांनीदेखील आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. तर ‘प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’नेदेखील मदतनिधीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाणार असल्याची घोषणा केली.