नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’चा नारा दिला. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही सक्रिय पाठिंबा दिला. दरम्यान अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विट करत पाठिंबा दिला आहे.

प्रकाश राज यांनी ट्विट करत शेतकऱ्यांचे समर्थन केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी एक कार्टून शेअर केले असून त्यांच्यामुळे तुमचे लक्ष विचलीत होऊ देऊ नका या आशयाचे ट्विट केले आहे.

आज विविध शेतकरी संघटनांची अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली. या आंदोलनात देशभरातील ३० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी झाल्या. याशिवाय, सीटू, हिंद मजदूर सभा, नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस आदी १० कामगार संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. या संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्या.

संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे. केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत. काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनीही या शेती विधेयकांना विरोध केला असून राष्ट्रपतींना या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती परत पाठवण्याची विनंती केली.