दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी समोर आले. यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. ‘मैंने मांगा राशन, उसने दिया भाषण’ असा मीम शेअर करत त्यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली आहे.

भाजपच्या ताब्यात असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने लक्षणीय यश मिळवलं. हा निकाल समोर आल्यानंतर अनेकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली. तर प्रकाश राज यांनी मोदींचं भाषण, त्यांचे परदेशी दौरे या मुद्द्यांवर उपहासात्मक मीम्स शेअर करत निशाणा साधला आहे. जनतेनं भाजपाला उत्तर दिलं आहे, निवडणुकांमधून जनतेनं त्यांची ‘मन की बात’ सांगितली आहे, असंदेखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मोदी खोटं बोलतात, प्रसारमाध्यमं खोट्या बातम्या पसरवते, भाजपाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात तर भाजपाचे कार्यकर्ते मात्र या गोष्टी गोष्टींवर विश्वास ठेवतात, असं एका मीममध्ये म्हटलं आहे.

प्रकाश राज यांनी आधीही मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. मोदी माझ्यापेक्षा उत्तम अभिनेते आहेत, ते मेलोड्रामा करतात, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली होती.