राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षानं थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली असून, विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आपल्या आमदारांना दिले आहेत. यासंदर्भात बसपानं आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या या राजकीय घडामोडिंवर अभिनेते प्रकाश राज यांनी संताप व्यक्त केला आहे. या राजकीय डावपेचांमुळे एकदिवस लोकशाहीच धोक्यात येईल, अशी टीका त्यांनी केली आहे.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

“लोकांनी निवडून दिलेलं सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या या मंडळींना लाज वाटायला हवी. यांच्यामुळे एक दिवस लोकशाहीच धोक्यात येईल.” अशा आशयाचं ट्विट करुन प्रकाश राज यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. प्रकाश राज समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर रोखठोक मतं मांडतात. या पार्श्वभूमीवर त्यांचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख

राजस्थानमध्ये मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. बंड केलेल्या सचिन पायलट यांनी अद्यापही माघार घेतली नसून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशोक गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करण्याचाही इशारा दिला आहे. या सगळ्या घटना घडत असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राजस्थानात काँग्रेस विरोधात भूमिका घेतली आहे.