‘एक्स फॅक्टर’ ते संगीतकार म्हणून नवी सुरुवात

संगीतक्षेत्रातील दिग्गज गायक-संगीतकार मंडळी सध्या सिनेसंगीत वगळता नव्या गाण्यांसाठी किंवा स्वतंत्र गाण्यांचा अल्बम काढण्यासाठी पुढे येत नाहीत. यामागे आर्थिक कारणे जशी आहेत त्याप्रमाणे अशा प्रकारचे नवे संगीत लोकांना आवडले नाही तर होणारे नुकसान लक्षात घेऊन त्यादृष्टीने प्रयत्नच केले जात नाहीत. या पाश्र्वभूमीवर प्रणिल मोरे या तरुण गायक, संगीतकाराने ‘सॉफ्ट रॉक बॅले’ या प्रकारातील गाणे तयार केले आहे. ‘मन बावरे’ हे त्याचे संगीतकार म्हणून पहिलेच गाणे असूनही रॉक प्रकारातील या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी चित्रित केला आहे.

‘एक्स फॅ क्टर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या प्रणिलला त्यावेळी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे मार्गदर्शन मिळाले होते. या शोमुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला गायक म्हणून ओळख मिळाली, असे प्रणिलने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.

लहानपणापासूनच गाण्याची आवड असल्याने आईवडिलांनी त्यादृष्टीने आपल्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे तो म्हणतो. पंडित भवदीप जयपूरवाले आणि उषाताई टिकेकर देशपांडे यांच्याक डून त्याने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर प्रत्येक शालेय, महाविद्यालयीन आणि अन्य संगीतस्पर्धामधून सहभाग घेणाऱ्या प्रणिलला ‘एक्स फॅ क्टर’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ मिळाले.

या रिअ‍ॅलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर एक ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे त्यानंतर देशविदेशात त्याने गाण्यांचे कार्यक्रम केले. जाहिराती, मालिका आणि चित्रपटांसाठीही पाश्र्वगायन सुरू होते. मात्र, तिथे इतरांची गाणी गात होतो. आपले स्वत:चे एक गाणे असावे, अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. त्यासाठी ‘मन बावरे’ या गाण्यावर काम सुरू केले, असे प्रणिलने सांगितले. ‘मन बावरे’ या गाण्याची  संकल्पना आणि धून डोक्यात तयार होती, काय सांगायचे आहे हे माहिती होते. मात्र, कौस्तुभ पानट या गीतकारामुळे गाण्याला खरे बोल मिळाले, असे त्याने सांगितले.

‘सॉफ्ट रॉक बॅले’ प्रकारातील हे गाणे नेहमीपेक्षा अत्यंत वेगळे असल्याने त्याला त्या बाजात गाणाराच गायक हवा होता. गायक -संगीतकार जसराज जोशी याचे गाणे आधीपासून ऐकले होते. त्यामुळे रॉक पण, हळूवार अशा पद्धतीच्या बाजाचे हे गाणे तो चांगले गाऊ शकेल, याची खात्री होती. जसराजनेही गाण्यासाठी होकार दिल्यावर त्याच्या आणि प्रणिलच्या आवाजात गाणे रेकॉर्ड करण्यात आले. मात्र, नवे गाणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी युटय़ुबसारखी माध्यमे उपलब्ध आहेत. त्यासाठी थोडे धाडस तुम्हाला दाखवावेच लागते. मलाही हे गाणे माझ्यापुरते मर्यादित ठेवायचे नव्हते. त्यामुळे या गाण्याचे चित्रीकरण करायचा निर्णय घेतला.

निर्माते जीतेंद्र धुळे यांच्यामुळे गाण्याचा व्हिडिओ करणे शक्य झाल्याची माहिती प्रणिलने दिली. संगीतकार म्हणून त्याने केलेल्या ‘मन बावरे’ या पहिल्याच गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आता त्याचे गाणे ‘झी टॉकिज’ने प्रसिद्धीसाठी घेतली आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नाला मोठी दाद मिळाली असून यापुढेही संगीतकार म्हणून गाण्यांवर नवनवे प्रयोग करण्याचा मानस असल्याचे प्रणिलने सांगितले.