पंधरा वर्षांपूर्वी नगरच्या नाटय़संमेलनात ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल आणि सदाशिव अमरापूरकर यांनी अ. भा. मराठी नाटय़ परिषदेतील मच्छिंद्र कांबळी यांच्या एकतंत्री अध्यक्षीय कारभाराविरोधात रणशिंग फुंकून सत्तांतराच्या लढाईला तोंड फोडलं होतं. ज्येष्ठ रंगकर्मी दामू केंकरे यांनी त्या लढय़ाचं नेतृत्व केलं होतं. परंतु सत्तांतर झाल्यावर नाटय़ परिषदेचे अध्यक्ष झालेल्या मोहन जोशी यांनी दामू केंकरे यांना अभिप्रेत असलेलं नाटय़ परिषदेचं सर्व रंगप्रवाहांना सामावून घेणारं सर्वसमावेशी स्वरूप प्रत्यक्षात आणण्याकामी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने नाइलाजानं अखेरीस दामू केंकरे, विजय तेंडुलकर आदी मातब्बर नाटय़कर्मींना रस्त्यावर उतरून नाटय़ परिषदेविरोधात पुनश्च एकदा दंड थोपटावे लागले होते. या लढय़ातून काही निष्पत्ती होण्याआधीच त्याचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ रंगकर्मी एकामागोमाग काळाच्या पडद्याआड गेल्याने परिषदेचा कारभार ‘जैसे थे’च सुरू राहिला.

त्यानंतरच्या नाटय़ परिषद निवडणुकीत विनय आपटे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील ‘हम करेसो’ कारभाराला पुन्हा एकदा आव्हान देण्यात आलं. परंतु त्यावेळी मतदान प्रक्रियेत हेराफेरी झाल्याचे गंभीर आरोप होऊनही मोहन जोशी हेच पुन्हा अध्यक्षपदी विराजमान झाले. यासंदर्भातील खटला अद्यापि निकालात निघालेला नाही. दरम्यानच्या काळात आणखीही बरंच ‘महाभारत’ घडलं.

Prakash Awade, dhairyasheel mane,
कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

नुकत्याच झालेल्या नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी यांच्या नेतृत्वाखाली ‘आपलं पॅनल’ने मोहन जोशी पॅनलविरोधात पुनश्च एकदा शड्डू ठोकला. यावेळी नाटय़ परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच खऱ्या लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणूक होऊन प्रसाद कांबळी यांच्या हाती बहुमताने नाटय़ परिषदेची सूत्रे आली. (यापूर्वी एकगठ्ठा मतं ‘गोळा’ करून नाटय़ परिषदेवर लोक निवडून येत.) ज्या मच्छिंद्र कांबळी यांना सत्तेतून पायउतार करून मोहन जोशी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष झाले होते त्यांच्याच पुत्राकडून ते पराभूत झाले. एक वर्तुळ पूर्ण झालं.

परंतु आता तरी नाटय़ परिषदेच्या कार्यशैलीत सुधारणा होणार का, ती सर्वसमावेशी होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. प्रसाद कांबळी यांची पाटी पूर्ण कोरी असल्याने आणि ते नव्या दृष्टीचे तरुण निर्माते असल्याने त्यांच्याकडून रंगभूमीच्या विविध प्रवाहांना खूप अपेक्षा आहेत. ‘समुद्र’, ‘बेचकी’, ‘संगीत देवबाभळी’ यांसारख्या मुख्य धारेच्या चाकोरीत न बसणाऱ्या नाटकांची निर्मिती करून त्यांनी स्वत:ही आपल्याबद्दलच्या अपेक्षा वाढविलेल्या आहेत. ते नाटय़निर्माता संघाचेही अध्यक्ष आहेत. (मच्छिंद्र कांबळी यांनीही ही पदे एकाच वेळी भूषवली होती.) त्यामुळे रंगभूमीच्या प्रत्येक घटकाशी त्यांचा नित्य संबंध येत असतो. स्वाभाविकपणेच त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यांची त्यांना निश्चितच जाण व भान आहे. दरवर्षी केवळ नाटय़संमेलन भरवण्यापुरतंच अस्तित्व दिसणाऱ्या नाटय़ परिषदेला आणि तिच्या कार्यशैलीला नवा चेहरा देण्याची संधी कांबळी यांना चालून आली आहे. तिला ते कितपत न्याय देतात, हे येणारा काळच ठरवेल. निवडणुकीत त्यांनी दिलेल्या दोन महत्त्वाच्या आश्वासनांबद्दल त्यांना आठवण करून दिली असता ते म्हणाले की, ‘नाटय़ परिषदेच्या कारभारासंबंधात आमच्या काही आशा-अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्याची संधी आता आम्हाला मिळणार आहे. नाटय़ परिषद ही स्वत:ला मराठी रंगभूमीची मातृसंस्था म्हणवून घेत असेल तर तिने रंगभूमीशी संबंधित सर्वच विषयांवर काहीएक ठोस भूमिका घ्यायला हवी असं आमचं म्हणणं होतं. आता ते प्रत्यक्षात करून दाखवण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. आणि आम्ही ती नक्कीच चांगल्या प्रकारे निभावण्याचा आमच्या परीनं प्रयत्न करू. त्याचबरोबर आमच्या प्रस्तावित योजनांचा तिमाही आढावा घेण्याची पद्धत आम्ही सुरू करणार आहोत. रंगभूमीशी संबंधित प्रत्येकाला नाटय़ परिषद आपली वाटायला हवी. यादृष्टीने आम्ही येत्या काळात पावलं उचलणार आहोत.’

नाटय़ परिषदेला आजवरच्या साचलेपणातून बाहेर काढण्याचं आव्हानही प्रसाद कांबळी यांच्यासमोर आहे. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, खरं आहे हे. मराठी रंगभूमी ही देशातील एक अत्यंत प्रगत रंगभूमी म्हणून ओळखली जाते. परंतु तरी राष्ट्रीय स्तरावर तिची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही, हेही वास्तव आहे. आपले काही रंगकर्मी वैयक्तिकरीत्या मोठे झाले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. परंतु त्यांच्या कामगिरीची यथोचित दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जायला हवी होती. पण तशी ती घेतली गेलेली नाही, हे अन्यायकारक आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांपासून विविध केन्द्रीय सांस्कृतिक अनुदानांपर्यंत मराठी रंगभूमीपर्यंत काहीच पोहोचत नाही. खरं पाहता संगीत नाटक अकादमी पुरस्कारांच्या योग्यतेचे २५-३० रंगकर्मी तरी सध्या मराठी रंगभूमीवर सक्रीय आहेत. परंतु त्यांची दखल राष्ट्रीय स्तरावर का घेतली जात नाही असा प्रश्न मला पडतो. नाटय़ परिषदेने या कामांमध्येही पुढाकार घ्यायला हवा. केन्द्र शासनाच्या रंगभूमीशी संबंधित अनेक योजनांची आपल्याला माहितीच नाही. ती माहिती मिळवून सर्वसंबंधितांपर्यंत पोहोचवण्याचे कामही महत्त्वाचे आहे. मराठी रंगभूमीचा परिप्रेक्ष्यही वाढवण्याची निकड आहे. प्रांतोप्रांतीच्या रंगभूमीशी मराठी रंगभूमीचे आदानप्रदान वाढवणे, जागतिक रंगभूमीशी तिचे नाते प्रस्थापित करणे अशा अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. याकामी पुढाकार घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही आमच्या परीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत. नाटय़ परिषदेचे संकुल हे रंगभूमीशी संबंधित सर्व घटकांच्या अभ्यासाचे केन्द्र व्हायला हवे. त्याकरता अर्थातच सर्वाच्या सहकार्याची गरज आहे. रंगकार्याशी संबंधित सर्वाशी विचारविनिमय करून आम्ही सर्वानाच या कामात सहभागी करून घेणार आहोत. त्यात आप-परभाव नसेल. निवडणुकीचा धुरळा आता खाली बसलेला असल्याने आपण सर्वानीच एकदिलाने एकत्र येऊन हे काम करावयाचे आहे असा आमचा दृष्टिकोन आहे. झाले-गेले विसरून सर्वानी एकत्र येऊ या असे आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो. या वर्षीचे नाटय़संमेलन कुठे आणि कसे भरवायचे, हा आमच्या अजेंडय़ावरचा आजचा पहिला विषय आहे. त्यादृष्टीने चाचपणी, चर्चा सुरू आहे. नाटय़ परिषदेचे अध्यक्षपद ही मोठीच जबाबदारी आहे याची मला नम्र जाणीव आहे. मी माझ्या परीने सर्वाना सोबत घेऊन ती चांगल्या तऱ्हेने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे असेही ते म्हणाले.