News Flash

तब्बल नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा..

‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकेची गोष्ट आहे दोन विरुद्ध स्वभावाच्या शेजाऱ्यांची.

प्रसाद-पुष्कर

मराठी चित्रपट आणि मालिकासृष्टीत अनेक मित्रांच्या जोडय़ा पडद्यावर, पडद्यामागेही हिट ठरल्या. त्यापैकीच एक प्रसाद-पुष्कर जोडी. या मित्रांची जोडी ‘अवघाची संसार’ या मालिकेतून तर ‘हाय काय नाय काय’सारख्या विनोदी चित्रपटांतून झळकली होती. मधल्या काळात स्वतंत्ररीत्या ते दोघे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते; परंतु पुन्हा एकदा एकत्र येऊन प्रेक्षकांना भरभरून हसवण्याची संधी त्यांना ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘हम तो तेरे आशिक है’ या नव्याकोऱ्या विनोदी मालिकेच्या माध्यमांतून तब्बल नऊ  वर्षांनी मिळाली आहे. त्यांच्या मैत्रीविषयी व मालिकेतील दोघांच्या जोडीविषयी सांगताना अभिनेता प्रसाद ओक म्हणतो, ‘‘पुष्कर आणि मी आम्ही दोघंही एकमेकांना खूप वर्षांपासून चांगलेच ओळखतो. एखाद्या दृश्यामध्ये एखादं खटय़ाळ वाक्य म्हणायचं असेल तर ते पुष्कर कसं म्हणेल याचा मला अचूक अंदाज असतो. आम्ही एकमेकांना पूरक आहोत. जेव्हा मला या मालिकेचं कथानक आणि सहकलाकार म्हणून पुष्कर असल्याचं कळलं तेव्हा मला फार आनंद झाला होता. कारण या मालिकेमध्ये नजरेचे खेळ व आविर्भाव अधिक आहेत. ते समोरच्या व्यक्तीला दाखवण्यासाठी तुमचे व त्या समोरच्या व्यक्तीचे संबंध मधुर असावे लागतात. तरच त्या आविर्भावाला न्याय मिळतो असं मला वाटतं. विनोदामध्ये टायमिंगला महत्त्व अधिक आहे. ते आमच्याकडून अचूक पाळलं जाईल व मालिका हिट ठरेल याची मला खात्री आहे.’’

‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकेची गोष्ट आहे दोन विरुद्ध स्वभावाच्या शेजाऱ्यांची. ‘आपली बरी.. दुसऱ्याची परी’, असं म्हणत दोघांचे एकमेकांच्या बायकांना भुलवण्यासाठी ‘प्रामाणिक’ प्रयत्न सतत सुरू असतात. ‘स्वभावाला औषध नसते’ या उक्तीला साजेसे पुरुष आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहेत. पुष्कर आणि संग्राम एकमेकांच्या बायकांवर मोहिनी करण्याची एकही संधी सहसा सोडत नाहीत. एकमेकांच्या बायकांच्या नजरेत राहण्यासाठी दोघांच्या जिवाचा आटापिटा सुरूच असतो. या बायकांभोवती घुटमळताना एकमेकांचा पाणउतारा करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत आणि मग अशा प्रसंगांमधून निर्माण होतो धमाल हास्यकल्लोळ!

या मालिकेत प्रसाद ओक मुंबईत स्थिरस्थावर झालेल्या, भाज्यांचा उद्योग असलेल्या एका कोल्हापुरी मर्दाची भूमिका साकारणार आहे. अशा प्रकारची भूमिका पहिल्यांदाच साकारत असल्याचे सांगून प्रसाद ओक भूमिकेविषयी सांगतो, ‘‘मी नेहमीच माझ्या प्रत्येक प्रोजेक्टनंतर एक वेगळा प्रोजेक्ट व एक वेगळी भूमिका स्वीकारत असतो. या मालिकेत माझी संग्राम वाघमारे नावाची भूमिका आहे. फणसाला ज्याप्रमाणे वरून काटे व आतून गोड गरे असतात त्याचप्रमाणे या संग्रामचं वागणं-बोलणं आहे. समोरच्या व्यक्तीला न दुखावता स्पष्ट शब्दांत बोलण्याचं चातुर्य त्याच्याकडे आहे. समोरच्याला नजरेत गार करण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. आपल्याला हवं तसं मजेत, ऐषोआरामाचं जीवन तो जगत असतो. कोल्हापुरी व्यक्तिरेखा असल्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा जिभेवर बसवण्यास मला अभिनेता प्रियदर्शन जाधव व हृषीकेश जोशी या माझ्या कोल्हापुरी मित्रांनी खूप मदत केली. पिळदार मिश्या व उत्तम देहबोली असलेला हा संग्राम साकारताना मजा येते आहे.’’

संग्रामच्या प्रामाणिक व हुशार व्यक्तिमत्त्व असलेल्या मित्राची भूमिका पुष्कर साकारतो आहे. याविषयी सांगताना अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतो, ‘‘माझी मालिकेत पुष्कर गुप्ते नावाची व्यक्तिरेखा आहे. तो एका मार्केटिंग कंपनीचा उपाध्यक्ष आहे. मृदुभाषी, अत्यंत साधा, शांतताप्रिय, खादाड अशी माझी व्यक्तिरेखा आहे. मालिकेमधली माझी बायको ही फिटनेस गर्ल आहे जी फार मुळुमुळु जेवण खाते आणि नवऱ्याला जबरदस्ती खाऊ  घालते. असा नवरा आपल्या मित्रपरिवारांमध्ये आपल्याला आजकाल हमखास पाहायला मिळतो आणि अशा नवऱ्याची भूमिका मला साकारायला मिळाली याचा आनंद अधिक आहे.’’

मालिकेत संग्रामच्या पत्नीची अभिनेत्री दीप्ती केतकरने केली आहे. वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मी सज्ज झाले आहे. या मालिकेत माझी कावेरी वाघमारे नावाची व्यक्तिरेखा आहे. अतिशय सुंदर, सोज्वळ आणि पाककुशल अशी परफेक्ट गृहिणी आहे. घरी आलेल्या सर्वाचं आदरातिथ्य ती करते. शेजाऱ्यांशी तिचे सलोख्याचे संबंध आहेत. कोल्हापुरी ठसका व्यक्तिरेखेत उतरवण्यासाठी मला आमची टीम खूप मदत करते. प्रसाद-पुष्करसोबत मी याआधी काम केलं आहे. बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करताना मला धमाल येते आहे. कावेरी हे खाऊन-पिऊ न वजनदार व्यक्तिमत्त्व असल्या कारणाने मला थोडं वजन वाढवावं लागल्याचं तिने आवर्जून सांगितलं.

तर सातत्याने नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली माधवी निमकर या मालिकेत पुष्करच्या पत्नीची भूमिका करते आहे. माधवी म्हणते, ‘‘मी कित्येक र्वष टेलिव्हिजनवर केवळ नकारी व्यक्तिरेखा साकारल्याने प्रेक्षक माझ्याबद्दल त्याच दृष्टीने विचार करतात. मात्र नकारी असल्या तरी याच भूमिकांनी मला अभिनेत्री म्हणून घडवलं ज्याचा मला अभिमान आहे; पण आता या प्रतिमेतून बाहेर पडण्याची माझी इच्छा होती. मी कित्येक महिने त्यासाठी मेहनत घेत होते. खूप ऑडिशन्स दिल्या. तेव्हा कुठे मला हवी तशी ही शालूची भूमिका मिळाली आहे.’’ यातली शालू फिटनेसप्रिय आहे. त्यामुळे पौष्टिक पदार्थ खाण्याकडे व इतरांना खिलवण्याकडे तिचा कल असतो.

या मालिकेची कथाकल्पना संजय मोनेंची असून अंबर हडप यांनी त्याला कथा-पटकथेचा आकार दिला आहे. मालिकेचं शीर्षकगीत अभिनेता-कवी संकर्षण कऱ्हाडेच्या लेखणीतून उतरलं आहे, तर रोहित राऊतने स्वरबद्ध केलं आहे. मालिकेची निर्मिती अमेय साळवी यांची तर दिग्दर्शन अजय मयेकर यांचं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:03 am

Web Title: prasad oak pushkar shrotri hum to tere aashiq hai marathi serial
Next Stories
1 इंग्लिश विंग्लिश : तिकडम ब्रिटकॉम!
2 ‘जात कहाँ हो अकेली गोरी।’
3 सुपरमॅनला त्याच्या भविष्याची चिंता
Just Now!
X