प्रत्येक कलाकार हा चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान, ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेक कलाकारांना ते मिळवण्यात यशही येते तर काही कलाकारांच्या हाती निराशा आल्याचे पाहायला मिळते. पण प्रत्येक कलाकाराच्या या प्रवासात एक तरी व्यक्ती अशी असते जी नेहमी पाठिंबा देते किंवा त्या व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे कलाकाराला कलाविश्वात ओळख मिळते. नुकताच एका कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये पाठिंबा देण्याऱ्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

अभिनेते प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर यांनी कलर्स वाहिनीवरील जितेंद्र जोशीच्या ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. दरम्यान प्रशांत दामले यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला अॅक्टींगला ज्येष्ठ नाटय़निर्माते सुधीर भट यांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले. ‘मला अॅक्टींगला सपोर्ट करणारा कोणी व्यक्ती असेल तर तो सुधीर भट. नाटकात घेताना त्याने माझ्याकडे पाच-दहा पैसे आहेत म्हणून घेतलं असेल. पण त्याने सातत्याने मला नाटकात घेतलं. त्यामुळे आज जो मी ५०-५५ वर्षांचा आहे आणि जे काही मिळवले आहे ते या व्यक्तीमुळे. त्याच्यामुळेचे मी इथपर्यंत पोहोचलो आहे’ असे प्रशांत दामले यांनी म्हटले आहे. तसेच सुधीर भट यांच्या विषयी बोलताना प्रशांत दामले भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

णखी वाचा : अभिजीत बिचुकलेने घेतली जितेंद्र जोशीची फिरकी, पाहा व्हिडीओ 

ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट यांनी सहा वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतला. नाट्य क्षेत्रात प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या सुधीर भट यांनी ‘मोरूची मावशी’, ‘कलम ३०२’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘गांधी विरुद्ध गांधी’, ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘किरवंत’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क, ‘जावई माझा भला’ अशा एकूण ७५ नाटकांची निर्मिती केली होती. देशा-विदेशात मराठी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी यांनी बरीच धडपड केली. त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटकांना युरोप, अमेरिकेतही उत्तम प्रतिसाद मिळाला.