हिंदीत छोटय़ा पडद्यावर
मराठी रंगभूमीवरील नाटकांच्या प्रयोगांना ‘अल्पविराम’ देण्याचा निर्णय घेतलेल्या प्रशांत दामले यांची नवी इनिंग हिंदीत छोटय़ा पडद्यावर लवकरच सुरू होणार आहे. ‘सब टीव्ही’वरील एका दैनंदिन महामालिकेत ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे रंगभूमीवर त्यांच्याबरोबरची सर्वाधिक यशस्वी अभिनेत्री कविता लाड-मेढेकरही या मालिकेत आहे. यामुळे मराठी रंगभूमीवरील हिट जोडी आता हिंदीतही एकत्र दिसणार आहे.
‘प्रशांत दामले यांचा नाटकांना अर्धविराम- नव्या खेळीसाठी तात्पुरत्या विश्रांतीचा निर्णय’ ही बातमी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिली होती. ‘सब टीव्ही’वरील दैनंदिन मालिकेसाठी प्रशांत दामले यांनी हा निर्णय घेतला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
‘चार दिवस प्रेमाचे’, ‘शू.. कुठे बोलायचे नाही’, ‘माझिया भाऊजींना रीत कळेना’, ‘एका लग्नाची गोष्ट’ आदी नाटकांतून प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची जोडी हिट ठरली आहे. २३ फेब्रुवारी १९८३ रोजी ‘टुरटुर’ या नाटकातून प्रशांत दामले यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांनी आतापर्यंत २६ नाटकांचे ११,०४७ प्रयोग केले आहेत. इतरही काही विक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत.
‘सब टीव्ही’वरील या दैनंदिन महामालिकेच्या चित्रीकरणाच्या व्यापातून नाटकाचे प्रयोग करणे शक्य नसल्याने नाटकाचे प्रयोग काही काळ थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही मालिका सुरू होण्याची तारीख अद्याप ठरलेली नसली, तरी साधारणपणे जुलैपासून तिचे प्रसारण सुरू होईल. मालिकेत एक महाराष्ट्रीय कुटुंब दाखविले असून, त्यातील मुख्य भूमिका प्रशांत दामले करीत आहेत. तर त्यांच्या बायकोची भूमिका कविता लाड-मेढेकर करत असून (महाराष्ट्रीय कुटुंबात गुजराथी सून) मालिकेत त्या गुजराथी भाषिक दाखविल्या आहेत. ही महामालिका निखळ विनोदी आणि कौटुंबिक असल्याचे सांगण्यात येते.
मराठी रंगभूमीवरील विक्रमी अभिनेते असलेले प्रशांत दामले या मालिकेमुळे आता देशभर पोहोचणार आहेत. हिंदूीतील या प्रवेशामुळे भविष्यात दामले यांच्यासाठी बॉलीवूडचे दरवाजेही उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीसाठी ती नवी ओळख आणि नवे आव्हान असणार आहे.