अभिनेते प्रशांत दामले यांच्या फेसबुक पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकी काय बातमी असणार याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. लवकरच एक आनंदाची बातमी मी देणार, अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘लवकरच एक मत्त आनंदाची बातमी देणार आहे मी’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली असून या पोस्टमधील ‘मत्त’ या शब्दाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. हे वाचतानासुद्धा चेहऱ्यावरचे निरागस भाव जाणवतात. नक्कीच बातमी मत्तच असणार, अशी कमेंट एकाने केली तर या वयात आनंदाची बातमी? असा गमतीशीर सवाल दुसऱ्या नेटकऱ्याने केली. मराठी रंगभूमीवरील अतिशय उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्व आहात तुम्ही, असं कौतुकसुद्धा नेटकऱ्यांनी केलंय. नवीन नाटक की परदेशी प्रयोग असा अंदाज काहींनी बांधला. प्रशांत दामलेंच्या या फेसबुक पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालंय.

आणखी वाचा : नवीन वर्ष लग्नसराईचं; २०२१ मध्ये लग्नगाठ बांधण्यासाठी हे मराठी कलाकार सज्ज

प्रशांत दामलेंच्या कामाचं राज्यपालांनी केलं होतं कौतुक

करोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे प्रशांत दामले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात सत्कार करण्यात आला होता. निर्माते सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांच्यासह विविध क्षेत्रात करोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या करोना योद्धांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.