व्यावसायिक नटाने व्यवसायासाठी काम केले पाहिजे. कटकटींनी त्रस्त असलेल्या प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटाचा परतावा देण्यासाठीच मी विनोदी नाटकांमध्ये काम करतो. प्रेक्षकांना तीन तास हसविणे हे आव्हान असेल तर ते स्वीकारायला मला आवडते, अशी भूमिका प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी शुक्रवारी मांडली.

दोन वर्षे विनोदी नाटकात काम केल्यानंतर सहा महिने गंभीर नाटकामध्ये काम करेन, असे अभिवचन त्यांनी प्रेक्षकांना दिले. गंभीर भूमिका माझ्या तब्येतीला झेपली पाहिजे, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ कार्यक्रमामध्ये दामले यांच्याशी त्यांच्या नाटय़प्रवासाचे साक्षीदार आणि त्यांच्या नाटकांचे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी संवाद साधला. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी त्यांचे स्वागत केले. रेश्मा राईकवार यांनी वाचकांचे प्रश्न विचारून दामले यांच्याकडून उत्तरे जाणून घेतली.

‘कोणताही विनोद स्वच्छ असला पाहिजे आणि सहकलाकाराच्या विनोदावर व्यक्त झाले पाहिजे,’ हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिलेला सल्ला मी आचरणात आणला. विनोदी कलाकाराला श्लील आणि अश्लील या अंधूक सीमारेषेवर उभे राहून काम करण्याची कसरत करावी लागते. शाळेमध्ये प्रत्येक धडय़ाखाली त्याचा गोषवारा दिलेला असतो. त्या धर्तीवर नाटकात तीन तास हसवून प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्यानंतर शेवटच्या काही क्षणांमध्ये संदेश दिला जातो,’ असे त्यांनी सांगितले.

रंगमंचावर प्रवेश पुण्यातूनच..

अकरावीला मी पिंपरी- चिंचवड येथील संघवी केसरी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात ‘काका किशाचा’ या नाटकामध्ये मी किश्याची भूमिका केली होती. त्यामुळे पुण्यातूनच माझा रंगमंचावर प्रवेश झाला, अशी आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली.