आपल्यापैकी अनेक जणांना भविष्य जाणून घेण्याची खूप इच्छा असते. आपल्या आयुष्यात काय घडणार किवा काय घडू शकते याचे भाकीत जाणून तशी अंमलबजावणी करणारे अनेक देवभोळे पाहायला मिळतात. अशा या सर्व लोकांसाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘गं सहाजणी’ या मालिकेचा मंगळवार दि.१३ डिसेंबरचा विशेष भाग पाहण्याजोगा आहे. ‘भविष्य’ आणि ‘भविष्यवाणी’ या दोघांपैकी अधिक प्राधान्य कोणाला द्यायचे आणि किती? याची माहितीच जणू हा भाग प्रेक्षकांना देणार आहे.

ज्योतिषशास्त्राच्या या विशेष भागात नाट्यसृष्टीचे नावाजलेले कलाकार प्रशांत दामले रसिकांसमोर येणार आहेत. पैसा हातात टिकत नाही म्हणून त्रासलेले एम.यू. पी. बी. बँकेचे  मॅनेजर धबडगावकर यांना शिपाई सावंत ज्योतिषांचा सल्ला घेण्याचे सुचवतो. सावंत यांच्या ओळखीचे ज्योतिषी (प्रशांत दामले) धबडगावकरांच्या मदतीसाठी सहाजणीच्या बँकेत येतात. ज्योतिष विद्येत पारंगत असणारे प्रशांत दामले धबडगावकरांच्या शंकेचे निरसन करतात, पण त्यासोबतच सहाजणीमधील कामिनीच्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे अचूक निदान करत सर्वांना अचंबित करतात. अशावेळी बँकेतील सर्वजण आपापले भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे धावतात. वर्तमानाचा विसर पडून माणसे भविष्य जाणून घेण्यास किती आगतिक होतात हे या भागात पाहायला मिळणार आहे.

मुळात, ज्योतिषशास्त्र हे नेमके काय असते याचे कुतूहल सामान्य लोकांमध्ये आजही आहे, आपले भविष्य जाणून घेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या नादात वर्तमानाकडे दुर्लक्ष करणारी अनेक माणसे आपण पाहत असतो. स्व: सामर्थ्याला दुय्यम लेखून केवळ भाकितावर भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणा-या अशा या माणसांना किती फायदा आणि नुकसान होते? हे या भागात पाहायला मिळणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या या विशेष भागात प्रशांत दामले गं सहाजणींच्या ताफ्यात काय भविष्यवाणी करतायत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भविष्यवेधाचा हा खेळ मंगळवार दि. १३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

स्टार प्रवाहच्या ‘गं … सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे यांनी केली असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन आले आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू झाली आहे. प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या कलाकृती पुरुषोत्तम बेर्डे यांनी या आधी निर्माण केल्या आहेत. निर्मळ विनोद आणि तिरकस विचार ही त्यांची खासियत. त्यामुळे ‘गं … सहाजणी’  काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. या मालिकेतून आताचे विषय हाताळण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच यात नोटाबंदीवरही एपिसोड दाखविण्यात आला होता.