अॅमेझॉन प्राइमवरील ‘रसभरी’ या वेब सीरिजमधल्या एका दृश्यावर प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वरा भास्करची मुख्य भूमिका असलेली ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. त्यातली लहान मुलीच्या नाचण्याच्या दृश्यावर प्रसून जोशी यांनी आक्षेप घेतला आहे. ‘हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषणाची मनमानी’, असा सवाल त्यांनी ट्विट करत विचारला आहे.

प्रसून जोशी यांनी ट्विट केलं, ‘दु:ख होतंय. रसभरी या वेब सीरिजमध्ये एक छोटी मुलगी पुरुषांसमोर उत्तेजक डान्स करताना एका वस्तूसारखं दाखवणं अत्यंत निंदनीय आहे. दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना आज याचा विचार करावा की ही गोष्ट मनोरंजनाची नाही तर लहान मुलांच्या प्रती असलेल्या दृष्टीकोनाचा हा प्रश्न आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषणाची मनमानी?’

या वेब सीरिजमध्ये स्वरा भास्कर एका शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्या अवतीभवती सीरिजची कथा फिरते. विशिष्ट वयोगटात तरुणांच्या मनात स्त्रियांविषयी येणाऱ्या विचारांवर उपहासात्मक पद्धतीने यात भाष्य करण्यात आलं आहे. निखिल भट्ट यांनी सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. यात स्वरा भास्करसोबतच आयुषमान सक्सेना, रश्मी अगडेकर, चित्तरंजन त्रिपाठी, नीलू कोहली, प्रद्युम्न सिंह, सुनिक्षी ग्रोवर, मंजू शर्मा, अरुणा सोनी, अक्षय सोनी यांच्या भूमिका आहेत.