बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेला आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरलेल्या ‘टकाटक’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच याचं मोशन पोस्टरही लाँच करण्यात आलं. आता त्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘टकाटक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमवला. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, अभिजीत आमकर, रितीका श्रोत्री, प्रणाली भालेराव हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये होते. अडल्ट कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आता या चित्रपटाचा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिक्वेलचं चित्रीकरण आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सुरु झाल्याची माहिती अभिनेता प्रथमेश परबने दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या मुहुर्ताचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट…नवा आरंभ, नवा विश्वास,नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. माझ्यातर्फे व माझ्या कुटंबातर्फे गुढीपाडव्याच्या म्हणजेच नूतन मराठी वर्षाच्या टकाटक शुभेच्छा. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या ‘टकाटक 2’ या चित्रपटाचा देखील मुहूर्त पार पडला.तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा निखळ मनोरंजन करण्यासाठी सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आम्ही हे शूट सुरू करतोय. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा सोबत असू द्या.”

त्याने त्याच्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत हे सरप्राईझ दिलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण गोव्यामध्ये सुरु असल्याचं त्याच्या या पोस्टवरुन कळत आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनीच या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असून संवाद किरण बेरड यांचे आहेत. गीतकार जय अत्रे यांची गाणी या चित्रपटातून ऐकायला मिळणार आहेत.

प्रथमेश परब लवकरच ‘लव सुलभ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्यासोबत मंगेश देसाई, प्रवीण तरडे, प्रियदर्शन जाधव, इशा केसकर हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prathamesh parab shared that shooting of takatak 2 started in goa vsk
First published on: 13-04-2021 at 13:12 IST