रेश्मा राईकवार

र-संसार नेटाने उभे करताना अनेक स्वप्ने पाठीशी टाकून माणसे धावत राहतात. धावण्याचा हा वेग वयानुरूप मंदावतो, काम थांबते, ज्या नात्यांसाठी- मुलांसाठी ही धावपळ सुरू असते, तीही कुठेकुठे स्थिरावतात. अशावेळी त्या हळूहळू सरकणाऱ्या काटय़ांवर एक रिकामपण जाणवते. जे जे करता आले नाही, करायचे राहून गेले आहे अशा अनेक गोष्टी जाणवतात. मात्र तोवर जगण्याची एक स्वत:चीच चौकट आपण घालून घेतलेली असते. ती चौकट मोडून, जे शेष आहे ते विशेष करायचा विचार दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी ‘प्रवास’ या चित्रपटातून मांडला आहे.

‘प्रवास’ म्हटले तर ती एका पिढीची गोष्ट आहे, आणि पाहायला गेले तर ती प्रत्येकाची गोष्ट आहे. स्वप्ने मोठी की घराची जबाबदारी मोठी? दोन्हींची सांगड घालायला हवी, पण ती सांगड घालणेच शक्य नसेल तर? व्यवहार खरा की मनाला जे जाणवतात ती स्पंदने, ते विचार खरे? नेमके ध्येय काय असायला हवे? हे द्वंद्व पिढय़ानपिढय़ा व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने सुरू असलेले पाहायला मिळते. आजची पिढी तर पैसा बाजूला सारून मनाचे समाधान मोठे म्हणत जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळतानाही दिसते. मात्र हे सगळे किती खरे आहे, यातले वास्तव किती, मिथक किती? याचा आपल्या पद्धतीने शोध घेत तो विचार मांडण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी या चित्रपटात केला आहे. अभिजात इनामदार आणि लता इनामदार (अशोक सराफ – पद्मिनी कोल्हापुरे) हे निवृत्तीच्या वयातले जोडपे. या जोडप्याचा मुलगा दिलीप परदेशात शिकतो आहे. हे दोघेही इथे मुंबईत एकमेकांना सावरत राहत आहेत. अभिजातची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत, त्यामुळे कधीही त्याची प्रकृती अचानक बिघडते, आठवडय़ातून दोनदा डायलिसिस करावे लागणाऱ्या अभिजातचा चिडचिडेपणा, डॉक्टरांच्या मागची प्रकृतीविषयीची भुणभुण ही सगळ्यांसाठी एकाचवेळी चेष्टेचा आणि रागाचाही विषय झाली आहे. मात्र याच आजारपणातून एक क्षण असा येतो, जेव्हा अभिजातला या सगळ्यातून बाहेर पडण्याची तीव्र गरज वाटू लागते. आयुष्याचे ध्येय काय हे शोधण्याचा त्याचा प्रवास अखेर त्याला नव्या माणसांशी, नव्या विचारांशी, नव्या आनंदाशी जोडून घेतो. पत्नी म्हणून अभिजातच्या या प्रवासाकडे आधी तटस्थपणे पाहणारी लताही एका क्षणी ते स्वत: अनुभवते आणि त्या प्रवासाचा भाग होते, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे.

आयुष्यात काही तरी वेगळे करायचे, स्वत:ला त्यातून समाधान मिळेल, खरा आनंद वाटेल असे काही शोधण्याचा अभिजातचा प्रवास आणि त्यातून त्याच्यात होत गेलेला बदल हा त्याच्यापुरता मर्यादित राहत नाही, हे यातले विशेष. हा बदल लताही आपलासा करते आणि रोजच्या रोज परदेशात राहून वडिलांशी संवाद साधणारा दिलीपही या विचाराने बदलतो. वडिलांमधला बदल आणि त्याचे कारण लक्षात घेताना एकीकडे आपण जे करतो आहोत ते बरोबर करतो आहोत की नाही, याविषयी त्याचीही चाचपणी सुरू होते आणि एका क्षणी हे तिन्ही बिंदू खूप वेगळ्या अर्थाने एकत्र येतात, अधिक घट्ट होतात. त्यामुळे वरवर पाहणाऱ्याला हा फक्त एका पिढीचा विषय आहे, असे वाटले तर ते चुकीचे ठरेल. हा विषय प्रत्येकासाठी लागू आहे आणि दिग्दर्शकाने तो खूप साध्यासोप्या पद्धतीने हाताळला आहे. सुरुवातीला थोडासा डॉक्युड्रामा पद्धतीने हा चित्रपट हाताळला जातो आहे की काय असा विचार येतो. तर नंतर नंतर मात्र त्यातील प्रत्येक प्रसंगात नाटय़ आणण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला असल्याने चित्रपटाचा एकूणच तोल बिघडला आहे. कथा आणि त्याची लांबी निश्चितच कमी करता आली असती. किंवा ती प्रभावी करण्यासाठी निदान काहीएक वेग मांडणीत हवा होता, जो चित्रपटात जाणवत राहतो. त्यामुळे चित्रपट अनेक ठिकाणी अनावश्यक ताणल्याचे सतत जाणवत राहते. अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे ही मुख्य जोडी आहे आणि संपूर्ण चित्रपट या दोघांनी तोलून धरला आहे. विशेषत: अशोक सराफ यांना खूप काळाने गंभीर भूमिकेत पाहण्याची संधी हा चित्रपट देतो. या दोघांची जोडी पडद्यावर पाहायला मिळणे हेही चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. कथाविषय म्हणून हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरतो आणि वर म्हटल्याप्रमाणे तो घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र त्याची चित्रपटासाठीची मांडणी करताना ती अधिक टोकदार पद्धतीने यायला हवी होती. तर त्याचा प्रभाव आणखी वाढला असता. चित्रपटाचा विषय पोहोचण्यासाठी तपशिलात जाऊन उभी केलेली दृश्ये आणि लांबच्या लांब संवादाची मांडणी यामुळे चित्रपटाचा प्रवास थोडा रेंगाळला आहे. मात्र तरीही हा प्रवास काही काही टप्प्यात का होईना तुम्हा-आम्हाला जोडून घेणारा आहे.

प्रवास

दिग्दर्शक – शशांक उदापूरकर

कलाकार – अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, शशांक उदापूरकर, विक्रम गोखले, रजित कपूर, श्रेयस तळपदे.