‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. पहिल्याच चित्रपटात ते बॉलिवूडचे भाईजान अर्थात सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात प्रवीण तरडेंनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

‘पुणे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे याबद्दल म्हणाले, “माझ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटामुळे सलमान आणि मी संपर्कात आलो. सलमान या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. हा चित्रपट त्याने अनेकदा पाहिलं आणि त्यातील माझं अभिनय त्याला खूप आवडलं. म्हणून ‘राधे’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी त्यांनी मला विचारलं. मी लगेचच हो म्हटलं. दहा ते १२ दिवस मी शूटिंगसाठी गेलो होतो. सलमानसोबत स्क्रिन शेअर करायला मिळत असल्याने मी फार खूश आहे.”

आणखी वाचा : गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचं उद्या लग्न; ‘या’ अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ 

‘राधे’ या चित्रपटात प्रवीण तरडे मराठी माणसाचीच भूमिका साकारत आहे. “सलमानसुद्धा मराठमोळाच आहे. तो मराठी भाषासुद्धा खूप चांगली बोलतो”, असं तरडेंनी सांगितलं.

सलमानने ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘धाक’ असं ठेवलं आहे. यामध्ये सलमानचा मेहुणा आयुष शर्मासुद्धा भूमिका साकारणार आहे. आयुषचा पहिला बॉलिवूड चित्रपट फ्लॉप ठरला. म्हणून आता दुसऱ्या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेतून त्याला प्रेक्षकांसमोर आणण्याचा सलमानचा प्रयत्न आहे.