|| मानसी जोशी

‘दिल बेचारा’ या चित्रपटानंतर मुकेश छाब्रा हे नाव प्रकाशझोतात आले. मात्र त्याआधी दोन दशके चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या या कास्टिंग डायरेक्टरने ‘काय पो छे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘चिल्लर पार्टी’, ‘डी डे’, ‘भूतनाथ रिर्टन्स’, ‘तमाशा’ या लोकप्रिय चित्रपटांसाठी कलाकारांची निवड करण्याचे काम के ले आहे. निर्भयावरील बलात्काराची कथा सांगणारी वेबमालिका ‘दिल्ली क्राइम’ला प्रतिष्ठित असा एमी पुरस्कार मिळाला आहे. या वेबमालिके साठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून त्यानेच काम पाहिले होते, त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांतील त्याच्या कामाला नवी ओळख मिळाली आहे.

प्रत्येक चित्रपट आणि वेबमालिका ही माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते. ‘काय पो छे’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना त्या कथेनुसार कलाकारांमध्ये वैविध्य पाहायला मिळते. एक कास्टिंग डायरेक्टर या नात्याने मी नेहमीच कथेनुसार त्या भूमिकेत कलाकार कसा चपखल बसेल या गोष्टींचा शोध घेतो. त्यावेळी कलाकार, त्याची प्रसिद्धी, मानमरातब या गोष्टी दुय्यम ठरतात. हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम १९९२’ आणि ‘दिल्ली क्राइम’ या दोन्ही वेबमालिका समीक्षक आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘दिल्ली क्राइम’ला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे मी कलाकारांची निवड योग्य केल्याची पावती मिळाली असल्याचे मुकेशने सांगितले.

‘दिल्ली क्राइम’साठी कलाकारांची निवड करणे थोडे क ठीण गेल्याचे मत छाब्राने व्यक्त केले. कारण त्याचा विषयही तितकाच संवेदनशील होता. देशात घडून गेलेले सर्वात क्रूर निर्भया हत्याकांड पुन्हा पडद्यावर जिवंत करण्यासाठी कलाकारांची निवड करण्याचे अवघड काम माझ्या खांद्यावर होते. या वेबमालिके साठी थोडा जास्त वेळ लागला. ‘स्कॅम १९९२’ करताना हंसल मेहतांसोबत काम केल्याने त्यांची पद्धत माहिती होती. ही मालिका साकारताना मी सतीश कौशिक, अनंत महादेवन यांनाही वेबमालिके त घेतले. यामुळे कथेत एक प्रकारची मजा तर आलीच, शिवाय तो काळ पुन्हा जिवंत उभा राहिला, असे त्याने सांगितले.

चित्रपटासाठी कलाकारांची निवड करताना एकाच वेळी काही ताकदीचे कलाकार तुमच्यासमोर असतात. त्यातून त्या व्यक्तिरेखेशी साध्यर्म साधणाऱ्या कलाकाराचा विचार केला जातो. ‘दंगल’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाच्या वेळी कलाकारांची निवड करणे अवघड गेल्याचे त्याने सांगितले. करोनामुळे आता ऑडिशनही ऑनलाइन झाल्या आहेत. याबद्दल मुकेशने सांगतिले की, वेळ तसेच कामाअभावी सर्वच कलाकारांना ऑडिशन देणे जमत नसे. मात्र आता आम्ही ऑडिशनसाठी जाहिरात दिल्यावर जगभरातून कोणताही कलाकार यात सहज सहभागी होऊ शकतो. परिस्थितीमुळे झालेला हा बदल एकप्रकारे कलाकारांच्या आणि कास्टिंग डायरेक्टर्सच्या पथ्यावरच पडला असल्याचेही त्याने सांगितले.

कास्टिंगची प्रक्रिया म्हणावी तशी साधी परंतु अवघड आहे. दिग्दर्शक चित्रपटाची कथा घेऊन आमच्याकडे येतात.  त्यातील मुख्य व्यक्तिरेखा ठरवल्या जातात. मग त्या व्यक्तिरेखेचे वय, शरीरयष्टी, वर्ण, व्यवसाय या गुण वैशिष्ट्यांची यादी केली जाते. चित्रपट अथवा मालिकेच्या टीमकडून हिरवा कंदील मिळाल्यावर देशभरातील कानाकोपऱ्यांतून, तसेच जगभरातून कलाकारांचा शोध घेण्यात येतो. आमच्याकडे रोज कास्टिंगसाठी हजारो तरुणांचे ई-मेल, फोन येतात. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचा अभिनय माझ्या मनाला पटत नाही तोपर्यंत मी त्यावर शिक्कामोर्तब करत नाही :- मुकेश छाब्रा

 

पुनित बालन स्टुडिओजचा नवा चित्रपट

 

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशानंतर नुकतेच निर्माते पुनित बालन यांनी ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. छायाचित्रणकार महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर समाजमाध्यमावर प्रदर्शित झाले. ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाच्या पोस्टरवर नायक-नायिके चे एकमेकांच्या हातात हात घातलेले चित्र दिसते आहे. मागे लंडनच्या बिग बेनची पाश्र्वाभूमी दाखवण्यात आली आहे. या पोस्टरमधील हे हात कोणाचे आहेत, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटाचे ९० टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार आहे. छायाचित्रणकार महेश लिमये यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर अजय अतुल संगीत देणार आहेत. महेश लिमये, गणेश पंडित आणि अंबर हडप त्रयी यानिमित्ताने एकत्र येत आहेत.  ‘जग्गू आणि ज्युलिएट’ हा एक रॉमकॉम असून तो यंदा दिवाळीत प्रदर्शित होईल, असे मत निर्माते पुनित बालन यांनी व्यक्त केले.