उद्योगपती नेस वाडियांवर विनयभंगाचा आरोप करणारी अभिनेत्री प्रिती झिंटा रविवारी दुपारी अमेरिकेहून मुंबईत दाखल झाली. या प्रकरणात सोमवारी तिचा जबाब नोंदविला जाण्याची शक्यता आहे.
  १२ जून रोजी अभिनेत्री प्रिती झिंटाने (३९) माजी प्रियकर आणि उद्योगपती नेस वाडियांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लगेचच ती अमेरिकेला रवाना झाली होती. तिच्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. परंतु प्रितीच्या अर्जात अनेक बाबी अस्पष्ट असल्याने पुरवणी जबाबाबासाठी हजर राहण्यास पोलिसांनी वकिलामार्फत सांगितले होते. त्यामुळे रविवारी दुपारी ती मुंबईत दाखल झाली.
 प्रितीचा जबाब कुठे नोंदवला जाणार याबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. किंग्ज इलेव्हन संघ कर्मचाऱ्यांसमोर, बैठकीची जागा सोडून गेल्यानंतर नेस वाडिया यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळी तिला नेऊन पंचनामा केला जाण्याची शक्यता आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी यापूर्वीच आयपीएलचे सीईओ (चीफ ऑपरेशन ऑफिसर) सुंदर रमण यांच्यासह सात जणांचे जबाब नोंदविले आहेत. याशिवाय रवी पुजारीने वाडियांना दिलेल्या धमकीबाबतही तिची चौकशी केली जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.