काही दिवसापूर्वी कलाविश्वात निर्माण झालेलं #MeToo मोहिमेचं वादळ आता काही अंशी शमलं आहे. या मोहिमेमध्ये अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती. अनेकांनी या प्रकरणी त्यांची मतेही मांडली. आता बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रिती झिंटानेही याविषयी एक वक्तव्य करुन नेटकऱ्यांचा रोष पत्करल्याचं पाहायला मिळालं आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या एका मुलाखतीमध्ये प्रितीने #MeToo या मोहिमेवर तिचं मत मांडलं. मात्र प्रितीने केलेलं व्यक्तव्य नेटकऱ्यांना रुचलं नसून त्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

‘कधी #MeToo सारख्या अनुभवातून जावं लागलं आहे का’ ? असा प्रश्न या मुलाखतीमध्ये प्रितीला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देत, ‘मला असा अनुभव अजूनपर्यंत तरी कधी आला नाही. पण मी ही ते अनुभवायला हवं होतं. जर मला #MeToo चा अनुभव मिळाला असता तर तुमच्या प्रश्नाचं मी योग्य प्रकारे उत्तर देऊ शकले असते’, असं उत्तर प्रितीने दिलं.

पुढे ती असंही म्हणाली, ‘आज की स्वीटू कल की मीटू हो सकती है’. #MeToo या महत्वाच्या मुद्द्याची खिल्ली उडविल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला तिला खडे बोल सुनावले आहे. अनेकांनी तिला परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तिला बोलताना विचार कर असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, प्रिती लवकरच ‘भैयाजी सुपरहिट’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी ती प्रचंड उत्सुक असून सध्या ती यााचित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.